लेनोव्हो थिंकपॅडची रौप्य महोत्सवी आवृत्ती जागतिक बाजारात दाखल
By शेखर पाटील | Published: October 9, 2017 03:59 PM2017-10-09T15:59:51+5:302017-10-09T16:02:45+5:30
लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेतील पहिल्या लॅपटॉपला २५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ थिंकपॅड २५ या नावाने नवीन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. लेनोव्हो कंपनीने पहिल्यांदा ५ ऑक्टोबर १९९२ रोजी थिंकपॅड ७०० सी हे लॅपटॉप सादर केले होते
लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेतील पहिल्या लॅपटॉपला २५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ थिंकपॅड २५ या नावाने नवीन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. लेनोव्हो कंपनीने पहिल्यांदा ५ ऑक्टोबर १९९२ रोजी थिंकपॅड ७०० सी हे लॅपटॉप सादर केले होते. यानंतर या मालिकेत अनेक मॉडेल्स सादर करण्यात आले असून याला जगभरात उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
या पहिल्या मॉडेलला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे लेनोव्हो कंपनीने थिंकपॅड २५ हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. याच्या डिझाईनमध्ये पहिल्या आवृत्तीची झलक दर्शविण्यात आली आहे. एका अर्थाने यात थिंकपॅडच्या क्लासीक डिझाईनला अत्याधुनीक फिचर्सने सज्ज करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात मूळ मॉडेलचा लोगो, मल्टीपल स्टेटस एलईडी आणि कि-बोर्डचा समावेश करण्यात आला आहे.
लेनोव्हो थिंकपॅड २५ या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा टचस्क्रीन या प्रकारातील आणि अँटी ग्लेअर तंत्रज्ञानाने सज्ज असणारा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात इंटेलचा अतिशय गतीमान असा कोअर आय७-७५००यू हा प्रोसेसर असून याला एनव्हिडीया जीफोर्स ९४०एमक्स या ग्राफीक्स कार्डची जोड देण्यात आली आहे. याची रॅम १६ जीबी असून स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. हे मॉडेल विंडोज १० प्रो या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहे.
लेनोव्हो थिंकपॅड २५ या मॉडेलमधील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३.४ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून याला विंडोज हॅलोचा सपोर्टदेखील असेल. तर यात डॉल्बी अॅटम प्रिमीयम हे अतिशय उच्च दर्जाचे स्पीकरदेखील देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायचा पर्याय देण्यात आला आहे. याच्या जोडीला तीन युएसबी ३.० पोर्ट, एक एचडीएमआय पोर्ट, एक युएसबी टाईप-सी पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, हेडफोन जॅक आदी पर्यायदेखील असतील. हा लॅपटॉप जागतिक बाजारपेठेत १,८९९ डॉलर्स अर्थात सुमारे १.२४ लाख रूपये मूल्यात लाँच करण्यात आल्याचे लेनोव्हो कंपनीने घोषीत केले आहे. लवकरच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.