लेनोव्होचा सुपर स्मार्टफोन लाँच
By शेखर पाटील | Published: May 30, 2018 01:02 PM2018-05-30T13:02:56+5:302018-06-05T15:20:58+5:30
लेनोव्हो कंपनीनं आज झेड ५ हा स्मार्टफोन लाँच केला असून यात अगदी उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्येही नसणारे फिचर्स असतील असे स्पष्ट झाले आहे.
लेनोव्हो कंपनीनं झेड ५ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. अगदी उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्येही नसणारे फिचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लेनोव्हो झेड ५ या मॉडेलबाबत जगभरात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष करून या कंपनीचे उपाध्यक्ष चँग चेंग यांच्या टिझर्समुळे या मॉडेलबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
झेड ५ हा स्मार्टफोनमध्ये बेझललेस अर्थात कडाविरहीत या प्रकारातील फुल व्ह्यू आहे. मात्र अलीकडच्या काळात बहुतांश फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये असणारा ‘नॉच’ यामध्ये नाही. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर केलेला आहे. यातील रॅमबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी यामध्ये तब्बल चार टेराबाईट (टिबी) इतके इनबिल्ट स्टोअरेज असणार आहे. पार्टीकल तंत्रज्ञानाचा वापर करून इतके मोठे स्टोअरेज यात देण्यात येणार आहे. यामध्ये कुणीही युजर २ हजार एचडी चित्रपट, दीड लाख गाणी अथवा तब्बल १० लाख प्रतिमांचे स्टोअरेज करू शकतो. इतके मोठे स्टोअरेज असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन ठरणार आहे.
लेनोव्हो झेड ५ या मॉडेलच्या एका टिझरमध्ये यात ४५ दिवसांचा स्टँडबाय टाईम असणारी बॅटरी देण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता हे मॉडेल सुपर स्मार्टफोन असेल असे मानले जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे.
(लेनोव्हो झेड ५ मॉडेलचे लीक झालेले छायाचित्र)