एलजी व्ही ३० मॉडेलची घोषणा; अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश
By शेखर पाटील | Published: August 31, 2017 03:19 PM2017-08-31T15:19:39+5:302017-08-31T15:20:54+5:30
एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
आयएफए-२०१७फच्या प्रारंभी एलजी कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणारे एलजी व्ही-३० हे मॉडेल जगासमोर सादर केले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा ओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले क्युएचडी म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने तब्बल दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस एफ/१.६ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा टेलिफोटो लेन्सयुक्त तर एफ/१.९ अपार्चरसह१३ मेगापिक्सल्सचा वाईंड अँगल लेन्सने सज्ज असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. याच्या मुख्य कॅमेर्यात अनेक उत्तम दर्जाचे फिचर्स देण्यात आले आहेत. यात सिने व्हिडीओ हे लक्षणीय आहे. याच्या मदतीने कुणीही अगदी चित्रपटासमान व्यावसायिक चलचित्रकाराच्या सफाईने शुटींग करू शकतो. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले असून यामुळे कुणीही प्रोफेशनल कलर ग्रेडींग प्रदान करू शकतो. या माध्यमातून स्मार्टफोनवरील व्हिडीओ चित्रीकरणाला एक नवीन आयाम प्रदान करण्यात आला आहे. याच्या जोडीला पॉइंट झूम हे अभिनव फिचर असेल. नावातच नमूद असल्यानुसार याच्या मदतीने व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. याच्या मुख्य कॅमेर्यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. आजवर स्मार्टफोच्या कॅमेर्यांमध्ये प्लॅस्टीकची लेन्स वापरली जात असते. मात्र एलजी व्ही ३० या स्मार्टफोनमध्ये प्रथमच काचेची लेन्स असून याच्या मदतीने चांगल्या प्रकाशमान प्रतिमा काढता येतील.
एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंटही आहे. यात उत्तम दर्जाच्या श्रवणानुभुतीसाठी हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तसेच यात दोन अतिशय उत्तम असे डिजीटल मायक्रोफोनही असतील. यामुळे व्हिडीओ रेकॉर्डींग करतांना उत्कृष्ट ध्वनीमुद्रण करता येणार आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला एलजी व्ही २० हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या एन या आवृत्तीवर चालणारा होता. यामुळे एलजी व्ही ३० मॉडेल हे अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ओरिओ म्हणजेच ओ या आवृत्तीवर चालणारा असेल असे मानले जात होते. तथापि, हे मॉडेल आधीच्याच म्हणजे एन प्रणालीवर चालणारा आहे. यात लवकरच अँड्रॉइड ओ अपडेट मिळणार असल्याचा दिलासा मात्र एलजी कंपनीने दिला आहे. हा स्मार्टफोन पहिल्यांदा दक्षिण कोरियात २१ सप्टेंबरपासून ग्राहकांना मिळणार आहे. यानंतर लागलीच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये हे मॉडेल मिळू शकेल असे मानले जात आहे.