गुगलचा सीईओ व्हायचंय? लिंक्डइननं दिली ऑफर; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:56 PM2019-07-30T15:56:21+5:302019-07-30T15:57:41+5:30

लिंक्डइनवरील पोस्ट पाहून अनेकांचे अर्ज

Linkedin Users Applied For Google CEO Sundar Pichais job | गुगलचा सीईओ व्हायचंय? लिंक्डइननं दिली ऑफर; पण...

गुगलचा सीईओ व्हायचंय? लिंक्डइननं दिली ऑफर; पण...

Next

सॅन फ्रान्सिस्को: गुगलसारख्या कंपनीत काम करायची संधी मिळाल्यास अनेकांना आनंद होईल. त्यामुळे गुगलमध्ये काम करण्याची संधी कोणीही सहजासहजी सोडणार नाही. त्यात जर गुगलमध्ये थेट सीईओ पदावर काम करण्याची ऑफर मिळाली, तर मग कोणाचाही आनंद गगनात मावणार नाही. असाच काहीसा अनुभव लिंक्डइन युजर्सना आला. आज सकाळी लिंक्डइननं गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज मागवले. गुगलसारख्या कंपनीचा सीईओ होण्याची संधी कोण सोडेल? त्यामुळेच अनेकांनी लगेच यासाठी अर्जदेखील केले. मात्र काही वेळातच काही तांत्रिक कारणामुळे लिंक्डइनकडून ही चूक झाल्याचं समोर आलं. त्यामुळे अनेकांचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंची जागा घेण्याचं 'सुंदर' स्वप्न भंगलं. 

एका सिक्युरिटी बगमुळे हा प्रकार घडल्याचं लिंक्डइननं स्पष्ट केलं. या सिक्युरिटी बगमुळे कोणत्याही कंपनीच्या लिंक्डइन पेजवरुन नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती. मिशेल रिजिंडर्स यांनी गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अचानक मिशेल यांची पोस्ट लिंक्डइनकडून लाईव्ह झाली. यानंतर अनेकांनी गुगलच्या सीईओ पदासाठी अर्ज केले. ही बाब लक्षात येताच लिंक्डइननं माफी मागितली. ती पोस्ट नेमकी कशी लाईव्ह झाली, याचा शोध घेत असल्याचं ते म्हणाले. 

लिंक्डइनवर जॉब पोस्ट करताना प्रीमियम सबस्क्रिप्शनची आवश्यकता असते. मात्र असं कोणतंही सबस्क्रिप्शन नसताना मिशेल यांनी मोफत पोस्ट केली. लिंक्डइन बोगस नोकऱ्यांसाठी नसल्याचं यानंतर कंपनीनं स्पष्ट केलं. बोगस नोकऱ्यांच्या ऑफर आमच्या यूजर्सपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं लिंक्डइननं म्हटलं. लिंक्डइनचा वापर नोकरी शोधण्यासाठी केला जातो. उमेदवार आणि कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून लिंक्डइन काम करतं. 
 

Web Title: Linkedin Users Applied For Google CEO Sundar Pichais job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.