लॉगीटेकचे हिंदी किबोर्ड दाखल
By शेखर पाटील | Published: April 11, 2018 05:52 PM2018-04-11T17:52:01+5:302018-04-11T17:52:01+5:30
लॉगीटेक कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी दोन हिंदी किबोर्ड बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून यातील एक वायरयुक्त तर दुसरा वायरलेस या प्रकारातील आहे.
भारतात संगणक आणि इंटरनेटचा वापर प्रचंड गतीने वाढला आहे. मात्र या तुलनेत भारतीय भाषांमध्ये अजून तंत्रज्ञान वापराचा वेग हा तुलनेत कमी आहे. अलीकडच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी याला जाणीवपूर्वक गती देयाचे प्रयत्न केले आहेत. आता भारतीय भाषांचा सपोर्ट असणारी सॉफ्टवेअर्स आणि विविध उपकरणे सादर केली जात आहेत. या अनुषंगाने संगणकीय उपकरणांसाठी ख्यात असणार्या लॉगीटेक कंपनीने के१२० आणि एमके२३५ हे दोन किबोर्ड सादर करण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही हिंदी किबोर्ड असून पहिले मॉडेल हे वायरयुक्त तर दुसरे वायरलेस या प्रकारातील आहे. भारतीय नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी लॉगीटेक कंपनीने .....ही मोहीम सुरू केली आहे. याच्या अंतर्गत हे दोन्ही किबोर्ड लाँच करण्यात आले असून या माध्यमातून देशातील ४० कोटी हिंदी भाषिकांना त्यांच्याच भाषेत टाईप करण्याची सुविधा देण्यात येत असल्याचे लॉगीटेक कंपनीने नमूद केले आहे. या माध्यमातून देशातील डिजीटल दरी सांधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लॉगीटेक के१२० हा किबोर्ड संगणक वा लॅपटॉपला युएसबी पोर्टच्या माध्यमातून कनेक्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर एमके२३५ हे मॉडेल ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येणार आहे. याची रेंज १० मीटरची असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे दोन्ही किबोर्ड विंडोज ७, विंडोज ८ आणि विंडोज १० तसेच क्रोम ओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार्या संगणकीय उपकरणांसोबत वापरता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये हिंदीसह इंग्रजीत टाईप करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
लॉगीटेक के१२० हे मॉडेल ६९५ रूपयात मिळणार असून यासोबत तीन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आली आहे. तर लॉगीटेक एमके२३५ या वायरलेस किबोर्डसोबत माऊसदेखील देण्यात आला असून या दोघांचे एकत्रीत मूल्य १,९९५ रूपये इतके असून याला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. हे दोन्ही किबोर्ड अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून १५ एप्रिलपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.