एम-टेक इरॉस स्मार्ट : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: April 12, 2018 11:54 AM2018-04-12T11:54:39+5:302018-04-12T11:54:52+5:30
एम-टेक कंपनीने इरॉस स्मार्ट या नावाने नवीन एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
एम-टेक कंपनीने इरॉस स्मार्ट या नावाने नवीन एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. एम-टेक कंपनीने याआधी फोटो ३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला होता. यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला होता. यानंतर इरॉस स्मार्ट या नावाने नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ४,७९९ रूपये असून रोझ गोल्ड, गोल्ड ब्लॅक आणि कॉफी या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.
एम-टेक इरॉस स्मार्ट या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात २,४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यावर सुमारे ७ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.