TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 05:18 PM2020-07-02T17:18:36+5:302020-07-02T17:21:06+5:30
Moj अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याठिकाणी त्याला 3.3 स्टार रेटिंग मिळाले आहे.
नवी दिल्ली : टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी बरेच अॅप्स समोर येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने असेच एक नवीन अॅप Moj लाँच केले आहे. हे अॅप दोन दिवसांपूर्वी आणले असून ते अल्पावधीत 50 हजारहून अधिक युजर्संनी डाऊनलोड केले आहे.
Moj अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याठिकाणी त्याला 3.3 स्टार रेटिंग मिळाले आहे. दरम्यान गेल्या सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर अनेक भारतीय अॅप्स समोर येत आहेत.
टिकटॉक सारखे फीचर्स असलेले हे भारतीय Moj अॅप आहे. यामध्ये आपण शॉर्ट व्हिडीओ तयार करू शकता. तसेच, दुसऱ्यांचे व्हिडीओ सुद्धा पाहू शकता. युजर्स15 सेकंदाचे व्हिडिओ अपलोड करू शकतात आणि फिल्टरद्वारे व्हिडिओ चांगले बनवू शकतात. यामध्ये लिप-सिंकिंग फीचर देखील आहे. इंटरफेस कॉपी सिंपल आहे.
हे अॅप हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि पंजाबी यासह 15 भाषांना सपोर्ट करते. मात्र, विशेष म्हणजे, हे अॅप इंग्रजी सपोर्ट करत नाही. प्ले स्टोअरच्या मते, यामध्ये आपल्याला डान्स, कॉमेडी, Vlog, फूड, DIY, मनोरंजन, बातम्या, मजेदार व्हिडिओ, गाणी, लव्ह शायरी यासारखा कॉन्टेंट मिळेल.
प्ले स्टोअरवर अॅपच्या डिटेल्समध्ये लिहिले आहे, 'Tik Tok, Viva Video, Vigo Video, New Video Status, Vmate, U Video, SelfieCity, Beauty Plus, YouCam makeup, Wonder Camera, Photo Wonder, Sweet selfie, Hago च्या यूजर्सचा या 100% मेड इन इंडिया अॅपवर स्वागत आहे'.
गेल्या काही दिवसांत चिंगारी (Chingari) आणि रोपोसो (Roposo) हे शॉर्ट व्हिडीओ अॅप्स देखील खूप लोकप्रिय झाली आहेत. चिंगारी अॅपला 50 लाख आणि रोपोसो अॅपला 5 कोटीहून अधिक डाऊनलोड्स मिळाले आहेत. त्याचप्रमाणे मिटरॉन (Mitron) या दुसर्या अॅपनेही 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.