देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:00 IST2025-03-01T07:00:08+5:302025-03-01T07:00:31+5:30
केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण जग एआयची चर्चा करीत असताना भारतातील सुपर कॉम्प्युटर्स चर्चेत आले आहेत. भारतीय आयटी तज्ज्ञांचा जगात दबदबा आहे. डॉ. विजय भटकरनिर्मित परम सुपरकॉम्प्युटरपासून सुरू झालेला प्रवास आता एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करीत असून देशभरातील ३४ सुपरकॉम्प्युटर्सपैकी सर्वाधिक अकरा महासंगणक महाराष्ट्रात आहेत.
केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या मंत्रालयाने २०१५ साली ४.५ हजार कोटींच्या निधीसह नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरू केले. यातून ३४ सुपरकॉम्प्युटर्स तयार झाले. ते शैक्षणिक, आयआयटी, आयआयएससी, सीडॅकसारख्या संस्था व प्रयोगशाळांमध्ये बसविण्यात आले. यापैकी सर्वाधिक ११ सुपरकॉम्प्युटर्स महाराष्ट्रात आहेत.
संपूर्ण स्वदेशी सुपर काॅम्प्युटिंग क्षमता : ‘एनएसएम’चे उद्दिष्ट होते- सुपर कॉम्प्युटिंगमध्ये स्वावलंबन व जागतिक नेतृत्व. यासोबतच सुपरकॉम्प्युटरची रचना, विकास, उत्पादन यावरदेखील विविध प्रयोग सुरू आहेत. देशात आता पूर्णपणे स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाची क्षमता निर्माण झाली आहे.
राज्यातील सुपर कॉम्प्युटर्स
सीडॅक-पुणे : १. परम सिद्धी, २. बायोइन्फॉर्मेटिक्स ३. संगम ४. परम श्रेष्ठ ५. परम एम्ब्रियो ६. परम नील ७. परम विद्या ८. परम संपूर्ण.
आयआयटी-मुंबई : परम रुद्र, आयआयएसईआर-पुणे : परम ब्रह्म, एनसीआरए-पुणे : परम रुद्र.
परम रुद्र तीन शहरांत
स्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले तीन परम रुद्र सुपरकॉम्प्युटर तयार करण्यात आले असून ते पुणे, दिल्ली व कोलकाता येथे इन्स्टॉल करण्यात आले.