झूमवर मेल, कॅलेंडरही पाहता येणार! लोकांमधील अंतर कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 09:45 AM2022-11-11T09:45:06+5:302022-11-11T09:45:27+5:30
कोरोनामध्ये मिटींग घेण्यास सर्वात सुलभ ठरलेल्या ‘झूम’ने आता आणखी नवीन फिचर्स सादर केली आहेत.
नवी दिल्ली :
कोरोनामध्ये मिटींग घेण्यास सर्वात सुलभ ठरलेल्या ‘झूम’ने आता आणखी नवीन फिचर्स सादर केली आहेत. ‘झूम’च्या वापरकर्त्यांना लवकरच मिटींगमध्येही मेल आणि कॅलेंडर पाहता येणार आहे. याबाबतची घोषणा ‘झूम’ने त्यांच्या वार्षिक झूमटोपिया इव्हेंटमध्ये केली आहे.
‘झूम’ने यंदाच्या वर्षात १,५००हून अधिक वैशिष्ट्ये आणि सुधारणा केल्याचा दावा केला आहे. ‘झूम’चा स्वतःचा मेल आणि कॅलेंडरच्या फिचर्समुळे वापरकर्त्यांना झूमवर अधिक काम करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘झूम’चे मेल आणि कॅलेंडर ॲप्स वापरण्यासाठी झूम वापरकर्त्यांना त्यांचे ई-मेल तपासण्यासाठी झूम प्लॅटफॉर्म सोडण्याची गरज नाही. ही सेवा सध्या बीटामध्ये तसेच अमेरिका आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे.
झूम मेलसाठी ई-मेलमध्ये
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असेल. झूम कॅलेंडर दरम्यान ॲपमध्ये झूम व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल शेड्यूल करण्यास परवानगी देईल, असे कंपनीने सांगितले.
१,५००+ वैशिष्ट्ये, सुधारणा यंदाच्या वर्षात केल्या आहेत.
झूम स्पॉट्स काय आहे?
-२०२३मध्ये येणारी झूम स्पॉट्स ही एक व्हर्च्युअल को-वर्किंग स्पेस आहे, जी अधिक वैयक्तिक काम करण्यासाठी तयार केली आहे.
- सध्या यातील बरेच तपशील कंपनीने सादर केले नसले तरीही हे स्पष्ट आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांमधील अंतर कमी करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे.