सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:02 PM2024-07-07T18:02:08+5:302024-07-07T18:02:47+5:30
या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा समोर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे.
हल्ली सायबर हल्ल्याची प्रकरणे सातत्याने समोर येताना दिसून येत आहे. यातच सायबर हल्ल्याचे आणखीन एक मोठे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हॅकर्सनी ९९५ कोटी पासवर्डची चोरी झाली आहे. हे प्रकरण म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक मानला जात आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा समोर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे.
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, bamaCare नावाच्या हॅकर टीमने ९९५ कोटी पासवर्ड लीक केले आहेत. ही माहिती Rockyou2024 नावाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हा डेटा लीक ऑनलाइन सर्व्हिससाठी वापरल्या जाणाऱ्या पासवर्डचा सर्वात मोठा ग्रुप आहे.
या डेटा लीकमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या वैयक्तिक माहितीचा समावेश असल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे. हॅकर्सनी बेकायदेशीरपणे अनेक ऑनलाइन अकाउंट्समध्ये प्रवेश केला आणि पासवर्ड व इतर वैयक्तिक माहिती चोरली. या लीकमुळे अनेक कर्मचाऱ्यांची तसेच सर्वसामान्यांची माहिती उघड झाली आहे.
ईमेल आणि लॉगिनची माहितीही धोक्यात
पासवर्ड व्यतिरिक्त, या डेटा लीकमध्ये ईमेल अॅड्रेस आणि लॉगिनची माहिती देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ हॅकर्स एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी या माहितीचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे या घटनेवरून असे लक्षात येते की, आपला वैयक्तिक डेटा किती असुरक्षित आहे?
सायबर सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती मोहीम
सायबर सुरक्षेच्या या मोठ्या घटनेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांकडून सायबर सुरक्षेची काळजी घेण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याची माहिती मागवली आहे. याशिवाय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
पासवर्ड सुरक्षतेसाठी काय करावे?
मजबूत पासवर्ड वापरा : लहान आणि साध्या पासवर्डऐवजी लांब आणि गुंतागुंतीचे पासवर्ड तयार करा.
पासवर्ड नियमितपणे बदला : तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदला.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा : यामुळे तुमच्या अकाउंट्सची सुरक्षा वाढते.
सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवा : सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती आणि जागरूक रहा.