स्मार्टफोनच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू; फोन वापरताना अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:58 AM2019-11-13T10:58:10+5:302019-11-13T11:02:36+5:30
फोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात.
नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठया प्रमाणात केला जातो. फोनचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं असतं. फोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. ओडिशामध्ये स्मार्टफोनच्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील पारादीपमध्ये ही घटना घडली. स्मार्टफोन चार्जिंगला लावून तरुण झोपला होता. बिछान्यावरच चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होत असताना एक रासायनिक प्रक्रिया होत असते. या वेळी बॅटरीवर दाब येत असतो. मात्र हा दाब मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास बॅटरीचा स्फोट होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फोनचा स्फोट होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. फोन चार्ज होत असताना कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
- स्मार्टफोन कपडे, कापूस किंवा बेड अशा ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा.
- फोनची बॅटरी रिप्लेस करायची असेल तर ओरीजनल ब्रँडची बॅटरीच लावा. कधीही स्वस्त आणि कमी दर्जाची बॅटरी आपल्या फोनसाठी वापरू नका.
- उशीखाली फोन ठेवून झोपणे अत्यंत धोकादायक आहे. कारण यामुळे फोनचे तापमान वाढते आणि त्यावर दाबही पडतो.
- जर फोन सतत वापरून गरम झाला असेल, तर त्याला नॉर्मल होऊ द्या. फोन गरम झाल्यानंतर सतत त्याचा वापर करू नका.
- फोन खराब झाल्यास लोकल शॉपवर दुरुस्त करू नका. कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच फोन दुरुस्त करणे सुरक्षित असते. तिथे ओरिजनल पार्ट्स देखील मिळतात.
चार्जिंगसाठी या टिप्स करा फॉलो
- फोन चार्ज करत असताना त्यावर कोणतीही वस्तू ठेवलेली नाही किंवा त्यावर कशाचाही दाब पडत नाही ना याची खात्री करा.
- नेहमी फोनचा ओरिजनल चार्जर वापरा. ड्युप्लिकेट किंवा इतरांच्या फोनचा चार्जर वापरल्यास फोन आणि बॅटरीचे नुकसान होऊ शकतं.
- फोन चार्ज करताना त्यावर ऊन पडत नाही ना याची काळजी घ्या. यामुळे फोनचे नुकसान होऊ शकते.
- रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. फोन आणि बॅटरीसाठी हानिकारक असतं.
- फोन पॉवर सॉकेटद्वारे चार्ज करा. एक्स्टेंशनद्वारे चार्ज करणे टाळा.