मेझ मोबाईलचे भारतात पदार्पण
By शेखर पाटील | Published: April 4, 2018 06:28 PM2018-04-04T18:28:11+5:302018-04-04T18:28:11+5:30
मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली.
मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली. या कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले असून, आपला मेझ अल्फा हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. आजवर बहुतांश चिनी कंपन्यांनी किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन्स सादर करून भारतीय बाजारपेठेवर कब्जा मिळवल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर, मेझ कंपनीनेही हाच पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. अर्थात मेझ अल्फा या मॉडेलमध्ये मध्यम किंमतपट्ट्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यात कडा विरहीत म्हणजेच बेझललेस या प्रकारातील ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा, फुल व्ह्यू आयपीएस, एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यावर २.५ डी ग्लास आणि कॉर्निंग गोरीला ग्लास ४ चे आवरण दिलेले आहे. या स्मार्टफोनला झिंक अलॉय मेटलचे आवरण दिलेले आहे.
मेझ अल्फा मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून, ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यामुळे यातून सजीव प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
तर यातील फ्रंट कॅमेरा हा १३ मेगापिक्सल्सचा असून यात ८४ अंशाचा वाईड अँगल असणारा कॅमेरा दिलेला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. हे मॉडेल मिडनाईट ब्लॅक या रंगात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूळ मूल्य १५,९०० असले तरी ग्राहकांना १४,३१० रुपयात हा स्मार्टफोन सध्या मिळत आहे.