मी यूट्यूबर : भाऊचा विषयच हार्ड हाय…
By जयदीप दाभोळकर | Published: November 20, 2022 12:23 PM2022-11-20T12:23:33+5:302022-11-20T12:26:14+5:30
डीपी सध्या इतका प्रसिद्ध झालाय की, अनेक जण त्याला लांबून भेटायलाही येतात...
कोणताही तणाव असो किंवा मूड खराब… भाऊचे व्हिडीओ पाहिले की चेहऱ्यावर अगदी हास्य येतं. डीपी म्हणून प्रसिद्ध असलेला धनंजय पोवार आणि त्याचं कुटुंब आज राज्यातल्या घराघरांत पोहोचलंय. पोवार कुटुंबीयांनी तयार केलेले फनी व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच धुमाकूळ घालतात. अगदी सोपे साधे विषय आणि ना कोणता अतिरेक, ना कोणती झगमग…
तुमच्या आमच्या जीवनातील घटना किंवा नवरा-बायकोमधील जुगलबंदी आणि त्यातली मजा ज्या पद्धतीनं हे कुटुंब सादर करतं ते पाहिल्यावर कोणाच्याही मनावरील ताण निघून जातो. गेल्या काही वर्षांमध्ये त्यानं हजारो व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केले आहेत. हजरजबाबीपणा आणि त्यातून तयार होणारे विनोद यात डीपीचा हात धरणं अशक्यच आहे. धनंजय पोवारच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ‘धनंजय पोवार डीपी’. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनलवर ५१७००० पेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत. १ मे २०२० रोजी त्यानं आपल्या चॅनलची सुरुवात केली आणि पाहता पाहता अवघ्या काही वर्षांत तो महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला.
धनंजय पोवार एक यूट्यूबर आहेच, त्याशिवाय तो यशस्वी व्यावसायिक देखील आहे. इचलकरंजी येथे त्याचं एक मोठं फर्निचरचं शोरूम आहे. इतकंच काय तर त्याचं आणखी एक स्पोर्टस् वेअरचं दुकानही आहे. इतकंच नाही तर डीपी दादा आपल्याशिवाय अन्य कॉन्टेंट क्रिएटर्सनाही त्यांच्या चॅनलसाठी कायम सपोर्ट करतो. अनेकदा तो त्यांच्या व्हिडीओमध्येही दिसतो. डीपी सध्या इतका प्रसिद्ध झालाय की अनेक जण त्याला लांबून भेटायलाही येतात. आपल्या दुकानातील कर्मचारी असो किंवा दुकानात येणारे ग्राहक कोणीही डीपी दादाच्या हातून सुटलेलं नाही. यापुढेही सर्वाचा डीपी दादा आणि त्याचे कुटुंबीय असंच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत राहील अशी आशा करूया.