मी यूट्युबर... लाखों दिलों की धडकन...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:41 AM2022-06-05T09:41:10+5:302022-06-05T09:41:38+5:30
Ajey Nagar : अजेय नागर देशातला लोकप्रिय यूट्युबर आहे. कॅरीमिनाटी या नावाने तो चॅनेल चालवतो.
देशाची राजधानी नवी दिल्लीतील एनसीआर भागात फरिदाबाद येथील रहिवासी अजेय नागरची आज देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख आहे. लाइव्ह गेमिंगबरोबरच कॉमेडी व्हिडीओ आणि सटायरिकल पॅरेडीज ही त्याची खासियत आहे.
वयाच्या दहाव्या वर्षापासून अजेयने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. हौस म्हणून तो हे सारे करायचा. मात्र, २०१४ पासून त्याने स्वत:चे चॅनेल सुरू केले. चॅनेलचे सुरुवातीचे नाव ॲडिक्टेडए१ असे होते. त्यावर नागर त्याचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ गेम फुटेज अपलोड करायचा. २०१५ मध्ये अजेयने चॅनेलचे नाव बदलून कॅरीदेओल असे ठेवले. सनी देओलची मिमिक्री करणे हा त्याचा खास छंद.
त्याच्या आवाजात विविध व्हिडीओ पोस्ट करणे तसेच काऊंटर स्ट्राइक, ग्लोबल ऑफेन्सिव्ह या गेम्सचे फुटेजही अजेय त्याच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट करायचा. त्याचे व्हिडीओज हळूहळू लोकप्रिय होऊ लागले. अजेयने कॅरीदेओलचे नाव नंतर कॅरीमिनाटी असे केले. गेल्याच वर्षी मे महिन्यात अजेय नागरने आपल्या युट्यूब चॅनेलचे तीन कोटी सबस्क्रायबर्स असल्याचे जाहीर केले. आपण लाखों दिलों की धडकन असल्याचा दावाही अजेयने केला आहे.
२०१९ मध्ये टाइम मॅगेझीनच्या नेक्स्ट जनरेशन लीडर्सच्या यादीत अजेय नागर दहाव्या क्रमांकावर होता. फोर्ब्स मासिकाने २०२० मध्ये तिशीच्या आतील ३० आशियाई उदयोन्मुख चेहऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यातही अजेय नागरचा समावेश होता. अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रनवे ३४’ या चित्रपटात अजेय नागरने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.