मी यूट्युबर: यूट्युबचा ‘शेठ’... विनायक माळीचा बोलबाला!
By सायली शिर्के | Published: August 21, 2022 07:47 AM2022-08-21T07:47:40+5:302022-08-21T07:49:15+5:30
आगरी भाषेचा चपखल वापर करत यूट्युबच्या विश्वात विनायक माळीने ठसा उमटविला आहे.
आगरी भाषेचा चपखल वापर करत यूट्युबच्या विश्वात विनायक माळीने ठसा उमटविला आहे.
प्रबळ इच्छाशक्ती, मेहनतीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. असंच काहीसं काहीतरी नवं करू पाहणाऱ्या एका तरुणासोबत घडलं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं आणि अल्पावधीत लोकप्रिय होऊन ते सत्यात उतरवलं. यूट्युबच्या दुनियेत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तो म्हणजे सर्वांचा लाडका दादूस, शेठ माणूस... विनायक माळी. त्याच्या आगरी भाषेतील व्हिडीओंनी तरुणांना भुरळ पाडली. त्याच्या भन्नाट व्हिडीओंनी सर्वांना अक्षरशः वेड लावलं.
विनायक माळी ते सर्वांचा लाडका दादूस हा त्याचा प्रवास सोपा नव्हता. आगरी भाषेला घराघरात पोहोचविणाऱ्या विनायकने सुरुवात हिंदी भाषेतून केली. पण हिंदीत हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने आपल्याच भाषेत मजेशीर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली अन् लोकांना ते प्रचंड आवडले. हाच धागा पकडून, त्याने यशाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि विनायक ‘स्टार’ झाला.
शेठ बोल शेठ..., काय रं बावलट... अशा हटके संवादाने लोकांची मनं जिंकली. त्याच्या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात. शेठ माणूस, गर्लफ्रेंड, माझी बायको या सीरिज प्रचंड गाजताहेत. नवनवीन विषय, वेगवेगळ्या कार, आपलेसे वाटणारे संवाद आणि खळखळून हसायला लावणारे विनोद ही विनायकच्या व्हिडीओंची खासियत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दादूसचे असंख्य चाहते आहेत. यूट्युबवर तब्बल २.३६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
विनायकने अलीकडेच आलिशान कार खरेदी केली. ‘घेतली एकदाची’ म्हणत त्याने मर्सिडिजचा व्हिडीओ शेअर केला होता. आपल्या घवघवीत यशाचं श्रेय तो संपूर्ण टीमला नेहमीच देतो.
- सायली शिर्के,
कंटेन्ट एक्झिक्युटिव्ह, लोकमत डॉट कॉम