मीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर
By शेखर पाटील | Published: May 23, 2018 11:17 AM2018-05-23T11:17:20+5:302018-05-23T11:17:20+5:30
मीडियाटेक कंपनीने खास भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसाठी नवीन प्रोसेसर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
मीडियाटेक कंपनीने खास भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसाठी नवीन प्रोसेसर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. प्रोसेसर हा कोणत्याही स्मार्टफोनमधील महत्वाचा घटक असतो. गतीमान प्रोसेसर असल्याशिवाय कोणतेही मॉडेल खर्या अर्थाने चांगले काम करू शकत नाही. यामुळे बहुतांश कंपन्या नेहमी चांगला प्रोसेसर वापरण्याला प्राधान्य देतात. या पार्श्वभूमिवर, मीडियाटेक कंपनीने हेलीओ पी २२ हा नवीन प्रोसेसर सादर करण्याची घोषणा केली आहे. हा एसओसी (सिस्टीम ऑन चीप) १२एनएम फिनफेट या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेली जगातील पहिली चीप होय. हा ऑक्टा-कोअर चीपसेट ड्युअल कॅमेरा सेटअपला सपोर्ट करणारा आहे.
यात १३+७ मेगापिक्सल्स क्षमतांचे तसेच ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने चित्रीकरणास सक्षम असणार्या कॅमेर्यांचा वापर करता येणार आहे. अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोन्समध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित विविध फिचर्स देण्यात येत आहेत. या अनुषंगाने हेलीओ पी २२ हा प्रोसेसर याला सपोर्ट करणारा आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी दीर्घ काळ वापरता येणार असल्याची बाबही महत्वाची आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अतिशय गतीमान अशा प्रोसेसींगसाठी हा प्रोसेसर उपयुक्त ठरणार आहे. याला मिड रेंज या प्रकारातील स्मार्टफोनमध्ये वापरता येणार असल्याचे मीडियाटेक कंपनीने जाहीर केले आहे.
स्मार्टफोन प्रोसेसरच्या क्षेत्रात मीडियाटेक कंपनीने आधीपासूनच भारतात विकल्या जाणार्या किफायतशीर व मध्यम किंमतपट्टयातील बाजारपेठेत आपला पाया मजबूत केला आहे. यात आता हेलिओ पी २२ या प्रोसेसरच्या माध्यमातून अद्ययावत फिचर्सने सज्ज असणार्या मॉडेल्समध्येही आपला प्रोसेसर वापरला जाईल याची तजवीज या कंपनीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.