Meta India:Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, आता 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:02 PM2022-11-03T22:02:17+5:302022-11-03T22:02:53+5:30
Meta India: फेसबुकमध्ये येण्यापूर्वी अजित मोहन चार वर्षे हॉटस्टारचे सीईओ होते.
Meta India: मेटा (Meta) म्हणजे फेसबुकचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. कंपनीची कमाई झपाट्याने कमी होत आहे आणि मार्क झुकरबर्गदेखील श्रीमंतांच्या यादीत खूप खाली आले आहेत. यातच आता भारतातूनमेटाला मोठा धक्का बसला आहे. मेटा भारताचे प्रमुख अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित मोहन आता फेसबुकची प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपचॅटमध्ये (Snapchat) सामील होणार आहेत. मात्र, त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. रिपोर्टनुसार, अजित मोहन आता स्नॅप इंकमध्ये (Snap Inc) सामील होण्याची तयारी करत आहेत. फेसबुकमध्ये येण्यापूर्वी अजित मोहन चार वर्षे हॉटस्टारचे सीईओ होते.
स्नॅपचॅट अमेरिकेतील लोकप्रिय कंपनी आहे. भारतात स्नॅपचॅट गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय होत आहे. मेटा ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले की, अजित मोहन यांनी मेटामधून राजीनामा दिला आहे आणि आता ते दुसरीकडे जात आहेत. त्यांनी गेल्या चार वर्षांपासून भारताच्या मेटा व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर मनीष चोप्रा मेटा इंडियाचे अंतरिम प्रमुख असतील. मनीष चोप्रा सध्या मेटा इंडियाचे भागीदारी प्रमुख आणि संचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, अजित मोहन यांनी जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडिया बिझनेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.