फेसबुक 10000 लोकांना कामावरून काढून टाकणार! Instagram आणि WhatsApp मध्येही होणार कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:48 AM2023-04-19T11:48:38+5:302023-04-19T11:49:19+5:30
मेटाने यापूर्वीच 11,000 लोकांना नोकरीवरून काढले आहे.
फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा पुन्हा एकदा नोकर कपात करण्याच्या तयारीत आहे. ताज्या राऊंडमध्ये जवळपास 10,000 लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्च 2023 मध्ये, मेटा सीईओ मार्क झुकबर्ग यांनी 10,000 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. आता कंपनी त्याच पावलावर पाऊल टाकत पुढे जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि रिअॅलिटी लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागेल. मेटाने यापूर्वीच 11,000 लोकांना नोकरीवरून काढले आहे.
मार्क झुकरबर्ग यांना वाटते की, कंपनीची कामगिरी सुधारण्यासाठी टीमच्या आकारात फेरबदल करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन मेटा अनेक हजार लोकांचा रोजगार संपुष्टात आणण्यासाठी पुढे जात आहे. दरम्यान, मार्चमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी खर्च कमी करण्यासाठी सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काम सोडण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत, ताज्या कपातीत हे 10,000 लोक आपल्या नोकऱ्या गमावतील असा अंदाज आहे.
कंपनीने व्यवस्थापकांना दिला आदेश
दरम्यान, आपल्या माहितीसाठी, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मालकी मेटाकडे आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बुधवारी कंपनीने व्यवस्थापकांना जॉब कट मेमो तयार करण्यास सांगितले आहे. या तीन सोशल मीडिया कंपन्यांशिवाय, रिअॅलिटी लॅबचाही समावेश केला जाऊ शकतो, जो व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित विभाग आहे.
सर्व टीमची पुनर्रचना केली जाईल
व्यवस्थापकांना पाठवलेल्या मेमोमध्ये, कंपनीने संपूर्ण टीमला सुरवातीपासून तयार करावे असे वाटते. जे कर्मचारी उपलब्ध असतील त्यांना नवीन व्यवस्थापकांच्या खाली ठेवले जाईल. याशिवाय, मेटा कंपनी बुधवारी उत्तर अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसोबत वर्क फ्रॉम होम करण्यासंदर्भात बोलू शकते, जेणेकरून कंपनीला थोडा वेळ मिळेल.
11,000 लोकांना नोकरीवरून काढले
मेटा कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये पहिली मोठी नोकर कपात केली होती. त्यादरम्यान कंपनीने 11,000 लोकांना कामावरून काढले होते. यामुळे मेटाचे कर्मचारी 13 टक्क्यांनी कमी झाले. तसेच, आता 10,000 लोकांची कपात केली जात आहे. अमेरिकन टेक फर्मने पहिल्या तिमाहीत नवीन भरतीवरही बंदी घातली आहे.