मायक्रोमॅक्स यू एस स्मार्टफोन : जाणून घ्या सर्व फीचर्स
By शेखर पाटील | Published: September 3, 2018 01:56 PM2018-09-03T13:56:40+5:302018-09-03T13:57:20+5:30
मायक्रोमॅक्स कंपनीची मालकी असणार्या यू टेलिव्हेंचरने एस हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून या किफायतशीर मॉडेलमध्ये सरस फीचर्स देण्यात आले आहेत.
मायक्रोमॅक्स कंपनीची मालकी असणार्या यू टेलिव्हेंचरने एस हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून या किफायतशीर मॉडेलमध्ये सरस फीचर्स देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच यू टेलिव्हेंचरने नवीन मॉडेल लाँच करण्याचे संकेत दिले होते. याचा टीझरदेखील जारी करण्यात आला होता. या अनुषंगाने हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. हा स्मार्टफोन २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज तसेच ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ५,९९९ आणि ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. शाओमीच्या रेडमी ५ ए या मॉडेलला तगडे आव्हान उभे करण्याची तयारी मायक्रोमॅक्सने केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मात्र मुळातच या सेगमेंटमध्ये अतिशय तीव्र चुरस असल्यामुळे यात बाजी मारणे सहजसोपे नसल्याची बाबही उघड आहे.
मायक्रोमॅक्स यू एस या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी६७३९ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार या स्मार्टफोनला दोन पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यात फेस अनलॉक या फीचरची सुविधाही दिलेली आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची दिलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.