मायक्रोसॉफ्ट कायझाला देणार व्हाटसअ‍ॅपला टक्कर

By शेखर पाटील | Published: July 28, 2017 06:48 PM2017-07-28T18:48:14+5:302017-07-28T18:48:32+5:30

मायक्रोसॉफ्ट कंपनीने खास भारतीयांसाठी कायझाला हे मॅसेंजर अ‍ॅप सादर केले असून या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपच्या मिरासदारीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.

microsoft kayzala app challenges whatsapp | मायक्रोसॉफ्ट कायझाला देणार व्हाटसअ‍ॅपला टक्कर

मायक्रोसॉफ्ट कायझाला देणार व्हाटसअ‍ॅपला टक्कर

Next

मायक्रोसॉफ्ट कंपनीने खास भारतीयांसाठी कायझाला हे मॅसेंजर अ‍ॅप सादर केले असून या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपच्या मिरासदारीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी जाणीवपूर्वक भारतावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वीच मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप आणि लिंक्डइन या सेवांचे लाईट अ‍ॅप भारतीयांना सादर केले आहेत. यातच आता कायझाला या नवीन अ‍ॅपची भर पडली आहे. अगदी नावापासूनच यातील भारतीयत्व कुणाच्याही लक्षात येऊ शकते. हे मॅसेंजर अ‍ॅप मुख्यत्वे कार्पोरेट कम्युनिकेशनला डोळ्यासमोर ठेवत विकसित करण्यात आले आहे. यात चॅटींगच नव्हे तर विविध मॅसेजेसचे ब्रॉडकास्ट, महत्वाच्या घोषणा, नोकर्‍यांची माहिती, सर्व्हे, पोल आदी बाबी शक्य आहेत. यात वैयक्तीक चॅटींगसह ग्रुप्समध्ये सामूहिक संदेशांचे आदान-प्रदान शक्य आहे. यामध्ये अगदी सुलभ पध्दतीने लोकेशन शेअरींग करणे शक्य आहे. तर लोकेशनसोबत फोटा पाठविण्याची सुविधाही यात आहे. यामध्ये कुणीही विविध सेवांची देयके (बील) सबमिट करू शकतो. तसेच चेकलिस्टच्या माध्यमातून अचूक नियोजन करण्याची सोयही यात आहे. ग्रुप कम्युनिकेशन आणि वर्क मॅनेजमेंटसाठी हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

 

कायझाला हे मॅसेंजर अ‍ॅप असल्यामुळे साहजीकच याची व्हाटसअ‍ॅपसोबत तुलना होणे स्वाभाविक आहे. कायझाला हे अनेक बाबींमध्ये व्हाटसअ‍ॅपच्या पुढे असल्याचे याच्या फिचर्सवरून दिसून येत आहे. व्हाटसअ‍ॅपवर ग्रुपसाठी २५६ सदस्यांची मर्यादा असली तरी कायझालासाठी मात्र असे कोणतेही संख्येचे बंधन नाही. यामुळे व्हाटसअ‍ॅपपेक्षा ते उपयुक्त ठरणारे आहे. तसेच वर नमूद केलेले बहुतांश फिचर्स व्हाटसअ‍ॅपमध्ये नाहीत हे लक्षात घेण्याची गरज आहे. यात अगदी सहजपणे हजारो व्यक्तींपर्यंत संदेश पाठविण्याची व्यवस्था असल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे. कायझाला हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि ओएस या दोन्ही प्रणालींसाठी मोफत प्रदान करण्यात आले आहे. मात्र यासोबत अधिक उत्तम फिचर्सचा समावेश असणारी याची प्रो आवृत्ती १३० रूपये प्रति-महा या दराने उपलब्ध करण्यात आली असून याचा प्रामुख्याने मोठ्या कंपन्यांना लाभ होणार आहे. कायझाला अ‍ॅप अधिकृतपणे लाँच करण्याआधीच मायक्रोसॉफ्टने त्याला विविध कंपन्या आणि राज्य सरकारांसाठी उपलब्ध केले होते. याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभल्याने हे अ‍ॅप आता जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. व्हाटसअ‍ॅपचा व्यावसायिक वापर सुरू होण्याची चिन्हे असतांनाच कायझाला अ‍ॅपचे लोकार्पण हे लक्षणीय मानले जात आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप टु-जी नेटवर्कवरही उत्तम गतीने चालत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: microsoft kayzala app challenges whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.