Microsoft Layoff: कंपनी कोणाचीच नसते? नाडेलांच्या मायक्रोसॉफ्टमध्ये २१ वर्षे राबला भारतीय; काढून टाकले... भाऊक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:18 PM2023-01-20T12:18:04+5:302023-01-20T12:18:24+5:30
कंपनीने नव्याबरोबरच जुन्या कर्मचाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ उडाली आहे.
मायक्रोसॉफ्टने जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीच या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कर्मचारी कपातीबाबत कळविले होते. आता याच कंपनीत २१ वर्षे काम केलेल्या भारतीयाला कंपनीने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
नाडेला यांनी कंपनीच्या भविष्यातील लक्ष्यांकडे पाहता कर्मचारी कपात करण्याचे यात म्हटले होते. कंपनीने नव्याबरोबरच जुन्या कर्मचाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखविल्याने खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये २१ वर्षांपासून काम करणाऱ्या प्रशांत कमानी यांचेही नाव या लिस्टमध्ये आहे. कमानी यांनी यावरून लिंक्डइनवर पोस्ट लिहिली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कमानी यांनी २१ वर्षांच्या काळाचे भावूक वर्णन केले आहे.
कमानी हे मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनिअर म्हणून १९९९ ला जॉईन झाले होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. १५ वर्षे त्यांनी तिथेच काम केले नंतर त्यांनी २०१५ मध्ये अॅमेझॉन ज़ॉईन केली. परंतू, पुन्हा २०१७ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये मॅनेजर म्हणून आले.
“कॉलेजनंतर माझी पहिली नोकरी मायक्रोसॉफ्टमध्ये होती. जेव्हा मी पहिल्यांदा परदेशात आलो तेव्हा मी थोडा घाबरलो आणि उत्साही होतो. माझ्यासाठी आयुष्यात काय काय आहे याचा विचार करायचो. मायक्रोसॉफ्टमध्ये 21 वर्षांहून अधिक काळ काम करताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक संस्थांमध्ये काम केले. हे सर्व संतोषजनक आणि फायद्याचे होते, असे कमानी यांनी म्हटले आहे.
मी मायक्रोसॉफ्टचा ऋणी आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये मला अतिशय हुशार लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मी माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी नेहमीच उपस्थित नव्हतो, परंतु मला मदत करण्यासाठी ते नेहमीच तयार होते. माझी नोकरी गेल्याची बातमी त्यांना दुखावणारी आहे. तितकीच त्रास देणारी आहे, असे कमानी यांनी म्हटले आहे.