Microsoft कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, विक्रीत घट झाल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:17 PM2023-01-18T12:17:15+5:302023-01-18T12:18:14+5:30
Microsoft : रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कंपनीत 5 टक्के (जवळपास 11 हजार कर्मचारी) कपात करण्याची योजना तयार केली आहे.
नवी दिल्ली : ट्विटर (Twitter), अॅमेझॉन (Amazon), मेटा (Meta), ओला (Ola) यासह अनेक मोठ्या कंपन्यांनंतर आता मायक्रोसॉफ्ट (Microsoft ) या सॉफ्टवेअर कंपनीने कर्मचारी कपात करणार आहे. रॉयटर्सने स्काय न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कंपनीत 5 टक्के (जवळपास 11 हजार कर्मचारी) कपात करण्याची योजना तयार केली आहे.
याचा अर्थ मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या कपातीचा 11,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कपातीचा प्रभाव अभियांत्रिकी विभागात होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कर्मचारी कपात पाहायला मिळणार आहे.
काय आहे कपातीचे कारण?
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, पर्सनल कॉम्प्युटर मार्केट अनेक तिमाहींपासून घसरत आहे, ज्यामुळे विंडोज आणि डिव्हाइसच्या विक्रीला फटका बसला आहे, ज्यामुळे कंपनीवर आपल्या क्लाउड युनिट Azure मध्ये वाढीचा दर कायम ठेवण्याचा दबाव आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलैमध्ये मायक्रोसॉफ्टने काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये Axios या न्यूज साईटच्या रिपोर्टमध्ये असे दिसून आले की, मायक्रोसॉफ्टने विविध विभागांतील सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी 30 जूनपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये 2,21,000 पूर्ण-वेळ कर्मचारी होते, त्यापैकी 1,22,000 युनायटेड स्टेट्समध्ये कार्यरत होते, तर 99,000 आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने उचललेले हे मोठे पाऊल भविष्यात टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कपातीची प्रक्रिया पुढे सुरूच राहण्याचे स्पष्ट संकेत देत आहे.