मायक्रोसॉफ्ट ऑफीस अॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 08:06 AM2018-07-19T08:06:02+5:302018-07-19T08:07:14+5:30
मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या एमएस ऑफीसच्या अंतर्गत येणार्या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अॅप्सचे अपडेट सादर केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी हे अपडेट देण्यात आले आहे. यात युजर्सला अनेक नाविन्यपूर्ण फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. हे टुल्स जगभरातील प्रोफेशनल्स मोठ्या प्रमाणात वापरतात. या अनुषंगाने याची उपयुक्तता वाढविणार्या फिचर्सचा या अपडेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत पॉवरपॉइंट अॅपमध्ये लँडस्केप मोड असतांनाही स्लाईड एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे यावर विविध प्रेझेंटेशन्स बनवितांना लाभ होणार आहे. ही सुविधा पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड युजर्सला देण्यात आली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये याला आयओएससाठी सादर करण्यात येणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे आऊटलूक अॅप वापरणार्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. ताज्या अपडेटमध्ये यातदेखील काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात डू नॉट डिस्टर्ब हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याचा वापर करून युजर आपल्याला हव्या नसणार्या वेळेतील ईमेल्सचे नोटिफिकेशन्स पॉज करू शकणार आहे. तसेच यात अॅपवरूनच कॉन्टॅक्ट डिलीट करण्याची सुविधादेखील आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यातील ड्राफ्ट सिंक हे फिचर होय. याचा वापर करून कुणीही एखादा इ-मेल स्मार्टफोनवर लिहण्यास प्रारंभ करून याला संगणकावर पूर्ण करू शकतो. तर याच्या अगदी विरूध्द म्हणजे संगणकावर सुरूवात करून स्मार्टफोनवर पूर्ण करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या अपडेटमध्ये वर्ड काऊंट हे फिचर देण्यात आले आहे. यामुळे कुणीही मजकूर लिहतांना तो नेमक्या किती शब्दांचा आहे? याची माहिती मिळवू शकणार आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित नवीन गेमींग सेवा सुरू करण्याचे संकेतदेखील दिले आहेत. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.