Microsoft Server Down : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे नेमकं काय?; जगभरातील यंत्रणा झाल्यात ठप्प, जाणून घ्या, कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 03:44 PM2024-07-19T15:44:54+5:302024-07-19T15:53:11+5:30
Microsoft Server Down : एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया...
जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडो युजर आज ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) चा सामना करत आहेत. यामुळे लाखो लोकांचे लॅपटॉप किंवा पीसी आपोआप शटडाऊन होत आहेत किंवा रीस्टार्ट होत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विमानसेवा, प्रसारमाध्यमे आणि शेअर बाजारही यामुळे प्रभावित होत आहेत. शुक्रवारी सकाळपासून या एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया...
ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय?
ब्लू स्क्रीन ऑफ डेथला ब्लॅक स्क्रीन एरर असंही म्हणतात. यामध्ये अशी परिस्थिती उद्भवते की विंडोज हे जबरदस्तीने शटडाऊन होतात किंवा काही कारणास्तव रीस्टार्ट होतात. या समस्येदरम्यान, युजर्सना लॅपटॉप किंवा पीसीवर मेसेज देखील मिळतात. तुमच्या कॉम्प्युटरला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी विंडोज बंद करण्यात आल्याचं त्यामध्ये लिहिलं आहे. ही समस्या काही हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरमुळे उद्भवली आहे, परंतु शुक्रवारी समोर आलेली समस्या ही विंडोजची अंतर्गत समस्या असल्याचं दिसतं. मात्र, यासाठी इतरही अनेक कारणं दिली जात आहेत.
ब्लू स्क्रीन ऑफ डेथच्या समस्येची कारणं काय?
हार्डवेअर फेलियर ते सॉफ्टवेअर समस्येमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथचा सामना केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, RAM, हार्ड ड्राइव्ह, ग्राफिक्स कार्ड किंवा पॉवर सप्लाय युनिटमुळे ब्लू स्क्रीन ऑफ डेथची समस्या उद्भवू शकते. त्याच वेळी, सॉफ्टवेअरमध्ये एप्लिकेशन्स, गेम किंवा ड्रायव्हर्स समाविष्ट आहेत, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. ब्लू स्क्रीन ऑफ डेथमुळे सिस्टम क्रॅश होऊ शकते.
कसा दूर करायचा प्रोब्लेम?
अशा परिस्थितीत अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हे ठीक करण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. तथापि, ही समस्या बऱ्याच प्रणालींमध्ये आली आणि रीस्टार्ट केल्यानंतर ते ठीक झालं आणि अधिक चांगले कार्य करत आहेत. अशा परिस्थितीत, रीस्टार्ट करण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीशी छेडछाड करू नका. CrowdStrike या समस्येवर काम करत आहे आणि लवकरच अपडेट जारी करेल.