भारतातही मिळणार मायक्रोसॉफ्टचं एक्सबॉक्स वन एस गेमिंग कन्सोल
By शेखर पाटील | Published: September 21, 2017 11:49 AM2017-09-21T11:49:34+5:302017-09-21T11:52:47+5:30
मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टने आपले एक्सबॉक्स वन एस हे गेमिंग कन्सोल पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्यदेखील जाहीर करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टने या वर्षाच्या जून महिन्यात एक्सबॉक्स वन एस या कन्सोलची घोषणा केली होती. ही आधीच्या एक्सबॉक्स वन या मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून काही देशांमध्ये याची विक्रीदेखील सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर भारतात हे मॉडेल १० ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे. या अनुषंगाने अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टल्सवर याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे. यानुसार ५०० जीबी स्टोअरेज असणारे एक्सबॉक्स वन एस हे मॉडेल २९,९९० रूपये तर एक टेराबाईट स्टोअरेजचे मॉडेल ३१,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासोबत ग्राहकाला फ्रोझा हॉरिझॉन ३ हा गेम मोफत मिळणार आहे.
एक्सबॉक्स वन एस हे कन्सोल एक्सबॉक्स वनपेक्षा आकाराने तब्बल ४० टक्के लहान असले तरी अत्यंत गतीमान असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे यात फोर-के क्षमतेच्या व्हिडीओचा सपोर्ट असल्याने याच्या मदतीने गेमिंगचा अत्युच्च आनंद लुटणे शक्य होणार आहे. यातील गेमपॅड हे ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने वायरलेस पध्दतीने उपकरणाशी कनेक्ट होणार आहे.