अॅपल वॉच बनविण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यांना जुंपले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:04 PM2018-10-30T14:04:21+5:302018-10-30T14:11:14+5:30
प्रसिद्ध आयफोन निर्माता कंपनी अॅपलचे वॉच बनविण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना जुंपले गेल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे.
हाँगकाँग : प्रसिद्ध आयफोन निर्माता कंपनी अॅपलचे वॉच बनविण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना जुंपले गेल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. अॅपलची पुरवठादार कंपनी क्वांटा कॉम्प्युटरमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे चीन आणि अॅपलच्या कायद्याचे उल्लंघन झाले असून अॅपलने याची चौकशी सुरु केली आहे.
सीएनएनच्या एका बातमीनुसार चॉन्गक्विंग शहरातील क्वांटा कॉम्प्युटरमध्ये काही 16 ते 19 वर्षाच्या विद्यार्थ्यांना काम करताना आढळले. या प्लांटमध्ये अॅपलचे वॉच बनविले जाते. या विद्यार्थ्यांमध्ये असे बरेचजण होते ज्यांचा या कामाशी काहीही संबंध येत नाही. त्यांच्या शाळेच्या प्रशासनाने या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या नावाखाली जबरदस्तीने क्वांटामध्ये पाठविले होते.
या विद्यार्थ्यांकडून ठराविक तासांपेक्षा जास्त कामही करून घेण्यात आल्याचे कामगार हक्क संघटनेचे कायकर्ते सैकॉम यांनी सांगितले. यावर अॅपलने खुलासा करताना सोमवारी सांगितले की, क्वांटाच्या प्लांटमध्ये मार्च ते जूमध्ये तीन वेळा ऑडिट करण्यात आले. मात्र, या वेळी कोणताही विद्यार्थी काम करताना आढळला नाही. मात्र, या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.
सैकॉम यांनी या विद्यार्थ्यांपैकी 24 जणांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी प्रचंड उकाड्याच्या दिवसांत या प्लांटमध्ये काम केले आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले की, अॅपल वॉचसाठी काम करायला लावले. रोज 1200 घड्याळे बनविण्याचे लक्ष्य दिले गेले होते. रोबो सारखे काम करावे लागत होते.