मोबाइलमधल्या डेटावर डल्ला : ज्युस जॅकिंग म्हणजे काय, कसे वाचावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 08:58 AM2023-08-08T08:58:55+5:302023-08-08T08:59:11+5:30
मोबाइल चार्जिंग हा तर आणखीनच भन्नाट विषय. चार्जिंग फुल्ल असले पाहिजे याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असतो.
मोबाइल आणि मोबाइलमधले नेटवर्क या दोन गोष्टी आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. एक वेळ दोन तास अन्न-पाण्यावाचून राहता येईल, पण मोबाइलमधले नेटवर्क अर्धा तासासाठी जरी गायब झाले तरी जीव कासावीस होतो एकेकाचा.
मोबाइल चार्जिंग हा तर आणखीनच भन्नाट विषय. चार्जिंग फुल्ल असले पाहिजे याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असतो. मात्र, कधी कधी अशी वेळ येतेच की चार्जिंग कमी झालेले असते आणि नेमकी त्याच वेळी महत्त्वाची, अतिमहत्त्वाची कामे आलेली असतात. सहसा अशी वेळ प्रवासात असताना येते. मग शोधाशोध सुरू होते चार्जिंग पॉइंट्सची. ते मिळाले की हायसे वाटते आणि निर्धास्तपणे मोबाइल चार्जिंगला लावला जातो. इथूनच ज्यूस जॅकिंग सुरू होते...
ज्युस जॅकिंग म्हणजे मोजक्या शब्दात सांगायचे झाल्यास तुमच्या मोबाइलमधल्या डेटावर डल्ला मारणे. विमानतळ, हॉटेल, कॅफेटेरिया आणि इतर सार्वजनिक स्थळांवर आता सर्रास चार्जिंग पॉइंट्स नजरेस पडतात. दिवसभरात अनेक गरजू त्याचा वापरही करतात. हीच बाब हेरून सायबर विश्वातले चाचे या अशा सार्वजनिक चार्जिंग ठिकाणांवर जाळे लावून बसलेले असतात.
तुम्ही मोबाइल चार्जिंगला लावला की त्यातील डेटा ट्रान्समिट होण्यास सुरुवात होते. सामान्यांच्या नजरेसही येणार नाही, अशा पद्धतीने ही डेटाचोरी सर्रासपणे सुरू असते. त्यात तुमचा वैयक्तिक तपशील, पासवर्ड, बँक खात्याचा तपशील, महत्त्वाचे दस्तऐवज, फोटो, संदेश इत्यादींचा समावेश असतो.
हा डेटा चोरून मग त्याची विक्री केली जाते. या डेटाचा वापर कधी, कुठे आणि कसा केला जाईल, याचा काहीही नेम नसतो. डेटा इज न्यू ऑइल, म्हणतात ते काही उगीच नाही.
कोणी शोधला हा शब्द?
ज्युस जॅकिंग या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला अमेरिकी पत्रकार ब्रायन क्रेब्स यांनी. शोध पत्रकार असलेल्या क्रेब्स यांनी २०११ मध्ये त्यांच्या लेखात या शब्दाची पेरणी केली. एखाद्या ग्लासमधील ज्युस स्ट्रॉ टाकून जसे प्यायले जाते अगदी तसाच तुमचा डेटा चार्जिंग पॉइंटरला मोबाइल चार्जिंगला लावला की शोषला जातो, असा या शब्दामागचा ढोबळ अर्थ.