दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 01:53 PM2021-08-06T13:53:19+5:302021-08-06T13:59:42+5:30
मे महिन्यात लँडलाइन ग्राहक मात्र वाढले; कंपन्या तरीही चिंतेत
मुंबई : कोरोनामुळे माणसा-माणसांत निर्माण झालेले अंतर तंत्रज्ञानाने दूर केले असले तरी या काळात तंत्रज्ञानापासून फारकत घेतलेल्यांची संख्याही कमी नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६.२७ दशलक्ष ग्राहकांनी मोबाइल सेवा बंद केली आहे. त्यामुळे दुरावलेले हे ग्राहक पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी धडपड सुरू केली आहे.
मोबाइल कंपन्यांच्या मे महिन्यातील कामगिरीचा एकत्रित अहवाल ‘ट्राय’ने नुकताच जाहीर केला. त्यानुसार देशातील एकूण मोबाइल वापरकर्त्यांची संख्या या काळात तब्बल ६.२७ दशलक्षांनी कमी झाली आहे. विशेष म्हणजे यात शहरी भागातील वापरकर्ते सर्वाधिक म्हणजे ४.१४ दशलक्ष इतके आहेत; तर ग्रामीण क्षेत्रातील संख्या २.१४ दशलक्ष इतकी आहे. एप्रिल महिन्यात देशभरात १२०३.४७ दशलक्ष मोबाइल ग्राहक होते. मे महिन्यात ही संख्या ११९८.५० दशलक्ष इतकी नोंदविण्यात आली.
असे असले तरी मे महिन्यात लँडलाइन ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे. या काळात १.३० दशलक्ष नागरिकांनी नवीन लँडलाइन जोडणी घेतली. त्यामुळे या क्षेत्राचा मासिक वृद्धिदर ६.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. देशभरात २१.६६ दशलक्ष लँडलाइनधारक असून, शहरी भागात १९.७० दशलक्ष आणि ग्रामीण भागात १.९६ दशलक्ष लँडलाइन वापरकर्ते आहेत. ब्रॉडबँड ग्राहकांचा विचार करता, मे महिन्यात ही संख्या ७८०.२७ दशलक्षांवर पोहोचली आहे. त्यात वायरलेस ७५७.५३, तर २२.७४ वायरलाइन ग्राहकांचा समावेश आहे.
कोणत्या कंपनीचे किती ग्राहक कमी झाले?
मे महिन्यात देशभरात ६२ लाख ७३ हजार ८९० ग्राहकांनी मोबाइलला रामराम केला आहे. त्यात भारती एअरटेलचे सर्वाधिक (४६,१३,५२१) ग्राहक कमी झाले असून, त्या खालोखाल व्होडाफोन आयडिया (४२,८१,५३२), बीएसएनएल (८,८०,८१०), एमटीएनएलची (२,४३६) ग्राहकसंख्या कमी झाली आहे. मात्र, रिलाइन्स जीओच्या ग्राहकसंख्येचा आलेख चढाच असून, या महिन्यात त्यांनी ३५ लाख ५४ हजार ७२२ नवे ग्राहक जोडले आहेत.