34 कोटी वार्षिक पगाराची नोकरी सोडून चर्चेत आले; आता 'या' कंपनीचे CEO पद मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:41 PM2023-03-13T18:41:58+5:302023-03-13T18:42:55+5:30
Mohit Joshi Infosys :कोण आहेत मोहित जोशी? इतिहासात पदवी घेतली अन् तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे नाव कमावले.
Mohit Joshi Infosys : मोठ्या टेक कंपन्यांच्या सीईओसह बड्या अधिकार्यांचा पगार कोट्यवंधींमध्ये असतो. हे सीईओ किंवा बडे अधिकारी अनेकदा त्यांच्या पगारामुळे चर्चेत येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका टॉप लेव्हल अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, जो दररोज सुमारे 9.5 लाख रुपये कमवतो. विशेष म्हणजे हा अधिकारी इतिहासात पदवीधर असूनही तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली प्रतिभा सिद्ध करत आहे.
आज आम्ही टेक महिंद्राचे नवे एमडी आणि सीईओ मोहित जोशी यांच्याबद्दल बोलत आहोत. गेली 22 वर्षे इन्फोसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर मोहित जोशी आता टेक महिंद्रासोबत नवा प्रवास सुरू करणार आहेत. ते टेक महिंद्राचे विद्यमान एमडी आणि सीईओ सीपी गुरनानी यांची जागा घेतील. मोहित जोशी यांचे शिक्षण, पगार आणि करिअरच्या प्रवासावर एक नजर टाकूया…
टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये वाढ
मोहित जोशी एंटरप्राइझ टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंग सेक्टरमध्ये 2 दशकांहून अधिक काळ सेवा देत आहेत.मोहित जोशी यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावता येईल की, त्यांची टेक महिंद्रात एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी समोर येताच कंपनीचा शेअर आज इंट्राडेमध्ये प्रचंड वाढला 8 टक्क्यांपर्यंत वाढला.
इन्फोसिसमध्ये अनेक प्रकल्पांचे नेतृत्व केले
ते गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसशी संबंधित आहेत. या काळात मोहित जोशी यांनी बँकिंग प्लॅटफॉर्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑटोमेशन पोर्टफोलिओ, सेल्स ऑपरेशन्स, ट्रान्सफॉर्मेशन, सीआयओ फंक्शन आणि इन्फोसिस नॉलेज इन्स्टिट्यूटचे नेतृत्व केले. इन्फोसिसच्या आधी त्यांनी ANZ Grindlays आणि ABN AMRO बँक यांसारख्या जगातील काही मोठ्या कॉर्पोरेशनसाठी काम केले.
दिवसाला 9.50 लाखांची कमाई
2021 मध्ये मोहित यांचा पगार 15 कोटींवरुन 34 कोटींवर पोहोचला होता. इन्फोसिस फाइलिंगनुसार त्यांना 2021-2022 मध्ये 34,89,95,497 रुपये (34.89 कोटी रुपये) मिळाले. याचा अर्थ त्यांने दररोज 9.5 लाख रुपये कमावले. आपल्या कारकिर्दीत मोहित यांनी आशिया, अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्ये त्यांची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड झाली.
शिक्षण काय?
मोहित जोशी यांनी दिल्ली पब्लिक स्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मॅनेजमेंट स्टडीजच्या फॅकल्टीमधून एमबीए केले. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूलमधून ग्लोबल लीडरशिप आणि पब्लिक पॉलिसीचा अभ्यास केला.