‘मोमो’चा जीवघेणा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 05:02 AM2018-08-19T05:02:33+5:302018-08-19T05:02:41+5:30

स्वत:ला कशात तरी गुंतवून घेण्यासाठी तरुणवर्गाचा ब्ल्यू व्हेल, मोमो अशा मोबाईल गेमच्या पर्यायांकडे ओढा वाढतोय.

momo game and suicides of children | ‘मोमो’चा जीवघेणा विळखा

‘मोमो’चा जीवघेणा विळखा

Next

- सीमा महांंगडे

चालू घडीला १५ ते २५ या वयोगटांतल्या मुला-मुलींच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या झाली आहे. मानसिक ताणतणाव हाताळण्याच्या स्वत:च्या सहनशक्तीबद्दल वाढत चाललेली साशंकता आणि कुटुंबांमध्ये हरवत चाललेला संवाद हे चुकीचे समीकरण जुळून आल्यामुळे तरुणांत नैराश्य वाढताना दिसतेय. साहजिकच, स्वत:ला कशात तरी गुंतवून घेण्यासाठी तरुणवर्गाचा ब्ल्यू व्हेल, मोमो अशा मोबाईल गेमच्या पर्यायांकडे ओढा वाढतोय. यावर उपाय म्हणून पालकांनी सहजपणे मुलांशी संवाद साधून, नेमके प्रश्न विचारून आणि त्यांची बाजू समजून घेऊन, आपण ही समस्या कमी करू शकतो का? यावर विचार व्हावा.
ब्ल्यू व्हेल म्हणा किंवा मोमो असो, या गेम्सचा अंतिम टप्पा आत्महत्या आहे, याची पुरेपूर माहिती असतानाही, तसेच त्यातील आव्हान स्वीकारण्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारच्या जीवघेण्या सूचना कुणाकडून तरी मिळणार आहेत, हे माहीत असूनही मुले याला बळी पडत आहेत. याचाच अर्थ, मुळातच ही मुले अतिशय नाजूक मनस्थितीत किंवा नैराश्यात किंवा आधीपासूनच आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात येत असले पाहिजेत, असा होतो. काहींबाबत थ्रिल अनुभवण्यासाठी हा प्रकार केला जातो किंवा इतर मित्रांच्या सांगण्यावरून किंवा एकदा करून तरी बघू, अशा भावनेतूनही याची सुरुवात होते आणि एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ही आव्हाने स्वीकारल्यानंतर, आता यातून बाहेर कसं पडायचं? किंवा घरातल्या मोठ्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट कशी सांगायची? या भीतिपोटी आत्महत्येचा पर्याय निवडला जातो, ही शक्यताही नाकारता येत नाही.
इथे मूळ प्रश्न हा त्या आधी असलेल्या नैराश्याच्या भावनेचा किंवा एकूणच भावनिक अस्थिरतेचा आहे. अनेक पालक आपल्या मुलांशी असे गेम्स, सोशल नेटवर्किंग साइट्स त्यातले धोके याबद्दल बोलले असतील. हे बोलायलाच हवं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मुलाच्या किंवा मुलीच्या मनात काय चालू आहे, तो किंवा ती निराशेच्या गर्तेत नाही ना, आपल्या आयुष्याबद्दल, शाळा-कॉलेज-मित्रमैत्रिणी याबद्दल त्यांचे काय विचार आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा संवादाचा मोकळेपणा दाखविणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी दिवसातून एकदा तरी कुटुंब एकत्र जेवायचे. त्या वेळी अनेक विषयांवर चर्चा होत असे. आता एकत्र येण्यासाठी कुणाकडे वेळच नाही. प्रत्येक जण स्वत:च्या कोशात अडकून पडलेला आहे. हातातला मोबाइल हाच त्यांचा एकमेव सखा आहे.
काळजी करण्यासारखी बाब म्हणजे, या गेम्सना बळी पडलेली बहुतेक मुले १२ ते २० या वयोगटांतली आहेत. खरं म्हणजे, हे वय आयुष्याचे ध्येय ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी चांगली स्वप्न बघण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचे असते. या टप्प्यावर असलेल्या मुलांची स्वप्ने काय आहेत, ती पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी विचार केला आहे का, हे पालकांनी समजून घ्यायला हवे. आपल्या पाल्याचे जर ध्येयच नसेल, तर ते निवडायला मदत केली पाहिजे. तसेच मुळात आपल्या आयुष्याची किंमत काय आहे, आपले आयुष्य कशासाठी आहे, अशा गंभीर विषयांवरसुद्धा हलक्या-फुलक्या वातावरणात गप्पा मारायला हव्यात. पालकांनी वेळेत योग्य प्रकारे आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधला, तर ते कुटुंबही सशक्त होते, पालकांना आपल्या चुका किंवा उणिवा समजू शकतात आणि जर आपल्या पाल्याला एखाद्या बाबतीत जरी अपयश आले असेल, तरी ती आपल्या आयुष्याची एक बाजू आहे आणि आयुष्याला फक्त तेवढीच बाजू नसून अशा अनेक बाजू आहेत, त्यामुळे अशा एका अपयशाने खचून एवढा मोठा निर्णय घेणे कसे चुकीचे आहे, यावर अशा गप्पांमधून मुलांचा विचार सुरू होऊ शकतो आणि ते वाईट विचारांपासून परावृत्त होऊ शकतात. पालक आणि पाल्य हे नाते आभासी जगापासून वास्तवात कसे जपले जाते, त्यांच्यात संवाद आणि चर्चा होते काय, हेही महत्त्वाचे आहे. आजकाल दोन्ही पालक पैसे कमावण्यासाठी घराबाहेर राहतात. त्यांचे संस्कारक्षम वयातील मुलांकडे दुर्लक्ष होते. ज्यांच्यासाठी आपण पैसे कमावत आहोत, त्यांची खरी गरज काय आहे, याचाही पालकांनी विचार करायला हवा.
आजच्या चौकोनी कुटुंबात प्रत्येक जण स्वकेंद्रित झाला आहे. नातेवाईक, मित्रमंडळींशी दुरावा वाढत चालला आहे. अनेक मुलांना त्यांच्या नातेवाइकांची पुरती ओळखही झालेली नसते. त्याला ही कोवळ्या वयातील मुले जबाबदार नाहीत, पालकही तेवढेच जबाबदार आहेत. ब्ल्यू व्हेल किंवा मोमोची एखादी लाट आली की, अचानक आपल्याला याचे गांभीर्य जाणवते. अशा वेळी मुलांना त्याबाबत सावध केले जाते आणि मग लेक्चर्स सुरू होतात. या ऐवजी आपण मुलांशी असणारा संवाद काही निमित्त नसतानाही कायम ठेवला, तर मुलं अशा तकलादू गेम्सना नक्कीच बळी पडणार नाहीत एवढं नक्की...!

Web Title: momo game and suicides of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.