फेसबुकवरील इन्स्टंट आर्टिकल्ससाठी मोजावे लागणार पैसे
By शेखर पाटील | Published: October 20, 2017 03:11 PM2017-10-20T15:11:24+5:302017-10-20T15:12:43+5:30
फेसबुकने प्रकाशकांसाठी प्रदान केलेल्या इन्स्टंट आर्टीकल्स या सेवेसाठी पेड सबस्क्रिप्शनची सुविधा दिली असून यातील पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे.
फेसबुकवरील पेजेसच्या माध्यमातून बहुतांश वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स आदी आपापले कंटेंट शेअर करत असतात. प्रसारमाध्यमांना हे शेअरिंग सुविधाजनक व्हावे यासाठी फेसबुकने अनेक सुविधा दिल्या आहेत. यात इन्स्टंट आर्टिकल्सचा समावेश आहे. यात कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यावर ती संबंधीत साईटवर रिडायरेक्ट होण्याऐवजी फेसबुकवरच खुलते. याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्या जाहिरातीतून येणारे उत्पन्न हे संबंधित लिंक शेअर करणारी मीडिया संस्था आणि फेसबुक यांच्यात विभाजीत करण्यात येते.
मात्र आजवर विशिष्ट रक्कम घेऊन वृत्त वाचणे अथवा पाहण्याची सुुविधा आजवर फेसबुकवर उपलब्ध करण्यात आली नव्हती. काही महिन्यांपूर्वी फेसबुक या प्रकारची चाचणी घेत असल्याचे वृत्त समोर आले होते. याला अलीकडेच मार्क झुकरबर्ग यांनी दुजोरा दिला होता. अर्थात ही सुविधा प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आली होती. आता याला अधिकृतपणे लाँच करण्यात आल्याची घोषणा फेसबुकतर्फे करण्यात आली आहे.
या अंतर्गत आता अमेरिका आणि युरोपमधील १० प्रकाशकांना अँड्रॉइडवरून त्यांचा मजकूर वाचण्यासाठी पेड सेवा सुरू करण्यात आली आहे. यात वॉशिंग्टन पोस्ट, टेलिग्राफ, इकॉनॉमीस्ट, द बोस्टन ग्लोब, हर्स्ट (ह्युस्टन व सानफ्रान्सिस्को क्रॉनिकल), ला रिपब्लिका, ले पर्शियन, स्पीगल, लॉस एंजल्स टाईम्स व द सान दिएगो युनियन ट्रिब्युन आदींचा समावेश आहे. हे प्रकाशक आता कोणत्याही वाचकाला पहिले काही आर्टीकल्स मोफत वाचू देतील. यानंतर मात्र आकारणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात फेसबुक मध्यस्थाची भूमिका बजावत असली तरी ही साईट कमीशन घेणार नाहीय. डिजीटल कंटेंटबाबत फेसबुकवर पहिल्यांदाच इतके महत्वाचे फिचर देण्यात आले असून याला किती प्रतिसाद मिळतोय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.