मस्तच! Twitter वर भारतीय भाषांची वाढतेय क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 12:31 PM2019-11-12T12:31:47+5:302019-11-12T12:34:27+5:30
मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या पाच वर्षात ट्विटरची लोकप्रियता वाढली असून चांगला महसूल मिळाला आहे. ट्विटरवर प्रादेशिक भाषांचा वाढता वापर केल्याने ही महसुलात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष महेश्वरी यांनी भारतात ट्विटरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कंपनीसाठी भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. जगभरात ट्विटरची वृद्धी होण्याचं सगळ्यात मोठं कारणं भारत आहे. आमची किंमत प्रिमियम असून आम्ही सगळ्या प्रिमियम ब्रँडसोबत काम करत आहोत' असं म्हटलं आहे.
ट्विटर वापरणाऱ्या भारतीय युजर्सच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईलचा वापर जास्त केला जातो. भारतात व्हिडीओ कॅटेगिरीत वाढ झाली असून अर्ध्यापेक्षा जास्त महसूल हा या सेगमेंटमधून येत असल्याचं देखील महेश्वरी यांनी म्हटलं आहे. तसेच ट्विटरवर प्रेफर्ड लँग्वेज ऑप्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे युजर्सना त्यानी निवडलेल्या भाषेत टाईमलाईनवर कटेंट दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'भारतात प्रादेशिक भाषांवर काम करणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. नॉन इंग्लिश ट्विटची संख्या हा सर्व ट्विट्सच्या 50 टक्के आहे. आम्ही बदल केल्यानंतर मागील 6 ते 8 महिन्यांमध्ये हे झालं आहे' अशी माहिती महेश्वरी यांनी दिली आहे. ट्विटरवर सध्या अर्धे ट्विट इंग्रजीमध्ये आहेत तर काही इतर भाषांमध्ये आहेत. यामध्ये हिंदी भाषेचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर तमिळ भाषेचा नंबर लागतो. ट्विटर 70 मीडिया पार्टनर्ससोबत काम करत आहे. जेणेकरून ट्विटरवर प्रादेशिक आणि स्थानिक कटेंट उपलब्ध होतील.
ट्विटर आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. ट्विटर लवकरच रिट्विट हे आपलं लोकप्रिय फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. याबदल्यात कंपनी नवीन अँटी-हरासमेंट फीचर्स आणत आहे. यामुळे ट्विटरवर रिट्विट करणं आणि दुसऱ्या युजर्सना मेन्शन करण्याची पद्धत पूर्णत: बदलणार आहे. ट्विटरच्या डेंटली डेविस यांनी एक ट्वीट करून याबाबतचे संकेत दिले आहेत. 2020 मध्ये ट्विटरवर कोणते बदल अपेक्षित आहेत याची माहिती डेविस यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. युजर्स आपलं खास ट्विट रिट्विट करण्याचा ऑप्शन बंद करू शकतात. तसेच एक यूजर दुसऱ्या युजर्सला त्याच्या परमिशन शिवाय मेन्शन करू शकत नाहीत. तसेच युजर्स आपल्या मर्जीने कोणत्या तरी खास संभाषणातून बाहेर पडू शकतात अशा गोष्टींचा समावेश ट्विटमध्ये करण्यात आलं आहे. यानुसार लवकरच युजर्स आपलं ट्विट कोणी रिट्विट करावं हे ठरवू शकतात.