अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारा मोटो ई ५ प्ले स्मार्टफोन
By शेखर पाटील | Published: July 16, 2018 04:39 PM2018-07-16T16:39:50+5:302018-07-16T16:40:20+5:30
मोटोरोला कंपनीने आता अँड्रॉइड गो या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा मोटो ई ५ प्ले हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला कंपनीने एप्रिल महिन्यात मोटो ई ५, मोटो ई ५ प्लस आणि मोटो ई ५ प्ले हे तीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. यातील मोटो ई ५ आणि मोटो ई ५ प्लस हे दोन मॉडेल्स अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील मोटो ई ५ प्ले या किफायतशीर स्मार्टफोनला आता अँड्रॉइड गो या प्रणालीसह बाजारपेठेत उतारण्याची घोषणा आता करण्यात आली आहे.
गुगलने अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) ही प्रणाली खास करून अत्यंत किफायतशीर मूल्यात अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्यासाठी विकसित केली आहे. भारतीय बाजारपेठेत मायक्रोमॅक्स, इंटेक्ससह अनेक कंपन्यांनी यावर चालणारे मॉडेल्स सादर केले आहेत. अलीकडेच समोर आलेल्या लीक्सचा विचार केला असता, सॅमसंगदेखील यावर चालणारा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याची शक्यता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या अनुषंगाने आता मोटोरोलानेही अँड्रॉइड गो प्रणालीची कास धरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटो ई ५ प्ले स्मार्टफोनचे नवीन मॉडेल हे याच आवृत्तीवर चालणारे असेल. यात खास या प्रणालीसाठी विकसित करण्यात आलेले अॅप्स देण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात हा स्मार्टफोन दक्षीण अमेरिकेसह युरोपात उपलब्ध करण्यात येणार आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलच्या मॉडेल्सची लोकप्रियता पाहता लवकरच आपल्याकडेही याला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. याचे मूल्य १०९ युरो अर्थात अंदाजे ८,७०० रूपये इतके आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत यापेक्षा कमी मूल्यात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
नवीन मोटो ई ५ प्ले या स्मार्टफोनमध्ये ५.३ इंच आकारमानाचा आणि मॅक्स व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ५.३ इंच आकारमानाचा (मूळ आवृत्तीपेक्षा एक इंच मोठा) आणि एचडी (१०८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा असणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ व ४२७ प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यातील ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा हा एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या फिचर्सने सज्ज असणार आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असणार आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.