अमेझॉन इंडियावरून मिळणार मोटो ई ५ प्लस
By शेखर पाटील | Published: July 5, 2018 11:41 AM2018-07-05T11:41:13+5:302018-07-05T11:41:46+5:30
लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने अलीकडेच मोटो ई ५, मोटो ई ५ प्लस आणि मोटो ई ५ प्ले हे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती.
अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून मोटो ई ५ प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार असून यात दर्जेदार बॅटरीसह अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोलाने अलीकडेच मोटो ई ५, मोटो ई ५ प्लस आणि मोटो ई ५ प्ले हे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. यापैकी मोटो ई ५ हे मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत उतारण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवर मोटो ई ५ प्लस या स्मार्टफोनची लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार हा स्मार्टफोन १०,७७० रूपयात ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार आहे. यासोबत हे मॉडेल मोटो हबमधूनही मिळणार आहे. कंपनीने जारी केलेल्या टिझरनुसार हा स्मार्टफोन १० जुलै रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे.
मोटो ई ५ या मॉडेलमध्ये ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती मल्टी-टास्कींगसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हाच या मॉडेलचा सेलींग पॉईंटदेखील असणार आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यामध्ये १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा मॅक्स व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा व मॅक्स व्हिजन या प्रकारातील असणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने वाढवण्याची सुविधा दिलेली आहे. यात एफ/२.० अपर्चर, पीडीएएफयुक्त तसेच एलईडी फ्लॅशची सुविधा असणारा १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.