मोटो जी ५ एस स्मार्टफोनची किंमत घसरली
By शेखर पाटील | Published: April 17, 2018 04:40 PM2018-04-17T16:40:25+5:302018-04-17T16:40:25+5:30
गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत मोटो जी५ एस हा स्मार्टफोन सादर करण्यात आला होता.
मोटोरोलाने आपल्या मोटो जी५ एस या स्मार्टफोनच्या मूल्यात चार हजार रूपयांची कपात करण्याचे घोषित केले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत मोटो जी५ एस हा स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. याला १३,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. यात जानेवारी महिन्यात एक हजाराची कपात करण्यात आली होती. आता याचे मूल्य तब्बल ४ हजार रूपयांनी कमी करण्यात आले आहे. यामुळे हे मॉडेल ग्राहकांना आता फक्त ९,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे ही कपात कायमस्वरूपी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यामुळे याच मूल्यात हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. लेनोव्होची मालकी असणारी मोटोरोला कंपनी येत्या काही दिवसांमध्ये मोटो जी६ आणि मोटो जी६ प्लस हे दोन फ्लॅगशीप श्रेणीतील स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या पार्श्वभूमिवर मोटो जी५ एसच्या मूल्यात कपात करण्यात आल्याचे मानले जात आहे.
मोटो जी ५ एस या स्मार्टफोनमधील फुल एचडी डिस्प्ले हा ५.५ इंच आकारमानाचा असून यावरदेखील कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी असून स्टोअरेज ३२ जीबी आहे. याच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात टर्बो पॉवर चार्जींगसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.