मोटोरोला स्पीअर प्लस : स्पीकर आणि हेडफोनयुक्त टु-इन-वन मॉडेल
By शेखर पाटील | Published: January 24, 2018 01:08 PM2018-01-24T13:08:47+5:302018-01-24T13:08:54+5:30
मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
मोटोरोला कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन या दोन्ही सुविधा असणारे स्पीअर प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
मोटोरोला ऑडिओ प्रॉडक्टचे भारतीय बाजारपेठेसाठी अधिकार असणार्या श्याम टेलिकॉम लिमिटेड या कंपनीने स्पीअर प्लस हे मॉडेल लाँच केले आहे. याचे मूल्य १२,९९९ रूपये इतके आहे. खरं तर बाजारात आधीच अत्यंत किफायतशीर दरात ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि हेडफोन्स उपलब्ध असतांना या मॉडेलचे मूल्य तसे थोडे जास्त आहे. मात्र यातील फिचर्सदेखील याच तोलामोलाचे आहेत. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यामध्ये गुगल असिस्टंट आणि अॅपलच्या सिरी या ध्वनी आज्ञावलीवर चालणार्या डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात प्रत्येकी ८ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर देण्यात आले आहे. तसेच यात संवेदनशील मायक्रोफोनही देण्यात आला आहे. याच्याच माध्यमातून कुणीही व्हाईस कमांडचा वापर करू शकतो. तसेच याच्याशी संलग्न असणार्या स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा रिसीव्ह करणेही शक्य आहे. याशिवाय, याच्या सोबत अतिशय दर्जेदार असा ब्ल्यु-टुथ कनेक्टिीव्हिटी असणारा हेडफोनही देण्यात आला आहे. यावर याच्याशी संलग्न असणारा स्मार्टफोन, टिव्ही तसेच अन्य उपकरणांमधील संगीताचा आनंद घेता येईल.
मोटोरोला स्पीअर प्लस या उपकरणात अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दाव आहे. तर या उपकरणाच्या ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीची रेंज तब्बल ६० फुटांपर्यंत असल्याचेही मोटोरोला कंपनीने नमूद केेले आहे.