मोझिला फायरफॉक्सचे अँड्रॉइडसाठी स्वतंत्र ब्राऊजर
By शेखर पाटील | Published: July 11, 2018 03:57 PM2018-07-11T15:57:12+5:302018-07-11T15:59:13+5:30
मोझिला फायरफॉक्सने अँड्रॉइड युजर्ससाठी स्वतंत्र ब्राऊजर सादर करण्याचे संकेत दिले
मोझिला फायरफॉक्सने अँड्रॉइड युजर्ससाठी स्वतंत्र ब्राऊजर सादर करण्याचे संकेत दिले असून ते अतिशय गतीमान असण्याची शक्यता आहे.
सध्या मोझिला फायरफॉक्स, गुगलचे क्रोम, मायक्रोसॉफ्टचे एज आणि अॅपलचे सफारी हे ब्राऊजर आघाडीचे मानले जातात. युजरला गतीमान आणि सुरक्षित वेब सर्फींगची सुविधा पुरविण्यात या सर्व ब्राऊजर्सची नेहमी चढाओढ सुरू असते. यामुळे सर्व ब्राऊजर्स वेळोवेळी नवनवीन अपडेटच्या माध्यमातून आपल्या युजर्सला सुविधा देत असतात. यातच आता फायरफॉक्सने अँड्रॉइडच्या युजर्ससाठी फेनीक्स या नावाने नवीन ब्राऊजर सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. वास्तविक पाहता, मोझिलाचे आधीच अँड्रॉइडसाठी ब्राऊजर असतांनाही नवीन ब्राऊजरची आवश्यकता काय? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तथापि, याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही. मात्र, टिन एजर्सला आकर्षित करण्यासाठी फेनीक्सला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती अनेक लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष करून गिटहब या संकेतस्थळावरील लिस्टींगमधून याबाबत सविस्तर माहिती मिळाली आहे.
फायरफॉक्स ब्राऊजरने अलीकडच्या काळात आपल्या युजर्सला अनेक उत्तमोत्तम फिचर्स दिले आहेत. या अनुषंगाने आपल्या वेब ब्राऊजरसाठी ऑग्युमेंटेड रिअॅलिटी म्हणजे विस्तारीत सत्यता आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजेच आभासी सत्यतेचा सपोर्ट देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच आता अँड्रॉइडसाठी स्वतंत्र ब्राऊजरची तयारी ही आश्चर्यकारक मानली जात आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.