एमएसआयचे तीन गेमिंग लॅपटॉप
By शेखर पाटील | Published: December 6, 2017 12:45 PM2017-12-06T12:45:36+5:302017-12-06T12:46:42+5:30
एमएसआय कंपनीने खास भारतीय गेमर्ससाठी तीन गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली असून याचे मूल्य 79 हजार 990 रूपयांपासून सुरू होणारे असेल.
भारतीय बाजारपेठेत गेमिंग लोकप्रिय होत असल्यामुळे खास यासाठी तयार करण्यात आलेले लॅपटॉपही लोकप्रिय होत आहेत. या अनुषंगाने एमएसआय कंपनीने जीव्ही 62 ही नवीन मालिका सादर केली आहे. यात जीव्ही 62 व्हीआर 7 आरएफ, जीव्ही62 7आरई आणि जीव्ही62व्हीआर 7आरएफ या तीन नवीन मॉडेल्सचा समावेश आहे. या सर्व मॉडेल्समध्ये इंटेलचा सातव्या पिढीतील अतिशय गतीमान कोअर आय-7 हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तर उत्तम गेमिंगसाठी एनव्हिडीयाच्या जीफोर्स या मालिकेतील ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यामुळे उच्च ग्राफीक्सयुक्त गेम्सची अनुभूती घेता येणार आहे.
यातल्या जीव्ही62व्हीआर 7आरएफ या मॉडेलमध्ये 15.6 इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम 16 जीबी आणि व्हिडीओ रॅम 6 जीबी इतकी असेल. यात 128 जीबी इतकी सॉलीड स्टेट ड्राईव्ह तर 1 टेराबाईटची हार्ड डिस्क ड्राईव्ह देण्यात आली आहे. यात थ्री-डी साऊंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून याच्या मदतीने उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. जीव्ही62 7आरई या मॉडेलमध्येही 15.6 इंची एचडी डिस्प्ले असेल. याची रॅम 8 जीबी असून उर्वरित फिचर्स आधीच्या मॉडेलप्रमाणेच असेल. तर जीव्ही62 व्हीआर 7आरएफ या मॉडेलमध्ये 15.6 इंची एचडी डिस्प्ले असून याचीही रॅम 8 जीबी असेल. उर्वरित फिचर्स आधीप्रमाणेच असतील. हे तिन्ही गेमिंग लॅपटॉप विंडोज 10 या प्रणालीवर चालणारे आहेत. यात अतिशय उत्तम दर्जाचा कि-बोर्ड तसेच माऊस देण्यात आला आहे. जीव्ही62 व्हीआर 7आरएफ, जीव्ही62 7आरई आणि जीव्ही62 व्हीआर 7आरएफ हे तिन्ही लॅपटॉप फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले असून यासोबत दोन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.