एलजी व्ही 30 प्लसच्या लाँचिंगचा ठरला मुहूर्त
By शेखर पाटील | Published: December 7, 2017 10:10 AM2017-12-07T10:10:39+5:302017-12-07T10:13:00+5:30
एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही 30 प्लस या फ्लॅगशीप मॉडेलला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची तारीख जाहीर केली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल.
एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही ३० प्लस या फ्लॅगशीप मॉडेलला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची तारीख जाहीर केली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल.
अलीकडेच एलजी कंपनीने आयएफए-२०१७ या टेकफेस्टमध्ये आपले एलजी व्ही ३० आणि व्ही ३० प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यातील एलजी व्ही ३० प्लस हे मॉडेल १३ डिसेंबर रोजी भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. कंपनीने यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. एलजी व्ही ३० प्लस या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात याच्या मागील बाजूस १६ व १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. यातील १६ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यात एफ/१.६ अपार्चर, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन, हायब्रीड ऑटो-फोकस आदी फिचर्सने आहेत. तर १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यात १२० अंशातील वाईड अँगल व्ह्यू आणि एफ/१.९ अपार्चर असेल. या दोन्ही कॅमेर्यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळेे व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. तसेच मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही ३० प्लस या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
एलजी व्ही ३० प्लस या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा क्युएचडी म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. एलजी व्ही ३० हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यात लवकरच ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.