Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये
By सिद्धेश जाधव | Published: April 16, 2022 12:48 PM2022-04-16T12:48:18+5:302022-04-16T12:58:53+5:30
Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या रेषा दिसू लागल्या आहेत, अशी तक्रार अनेक युजर्सनी सोशल मीडियावर केली आहे.
Samsung स्मार्टफोन आपल्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. म्हणून जास्त किंमत देऊन देखील कमी फीचर्स असलेले स्मार्टफोन्स ग्राहक विकत घेतात. इतकंच नव्हे तर इतर स्मार्टफोन कंपन्या देखील सॅमसंगकडून पार्टस विकत घेतात. यात डिस्प्ले पॅनेल्सचा देखील समावेश आहे. परंतु आता सॅमसंगच्याच एका स्मार्टफोनचा डिस्प्ले बिघडू लागला आहे. याची तक्रार युजर्सनी सोशल मीडियावरून केली आहे.
सोशल मीडियावर काही युजर्सनी Samsung Galaxy S20+ डिस्प्लेवर अचानक आलेल्या हिरव्या आणि गुलाबी रेषांची तक्रार केली आहे. नवीन One UI वर अपडेट केल्यानंतर ही समस्या येत आहे. काही भारतीय युजर्सनी ही तक्रार करण्यासाठी Samsung Community, Reddit आणि Twitter चा वापर केला आहे.
विशेष म्हणजे स्मार्टफोन कुठेही पडला किंवा कशावर आदळला नाही. तरीही Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर अचानक हिरव्या आणि गुलाबी रेषा दिसू लागल्या आहेत. काही युजर्सनुसार, त्यांच्या फोनमध्ये हा बिघाड One UI 4.01 वर अपडेट केल्यानंतर झाला आहे.
सध्या तरी, अचानक सॅमसंग फोनच्या डिस्प्लेमध्ये दिसणाऱ्या या रेषा अपडेटमुळे आल्याचं स्पष्ट झालं आंही. तसेच हा अपडेट मिळालेल्या इतर मॉडेल्सच्या युजर्सकडून कोणतीही तक्रार दिसली नाही. ही समस्या फक्त फक्त सॅमसंग गॅलक्सी एस20 प्लस मॉडेलपर्यंत मर्यादित आहे. तसेच, यात आउट-ऑफ वॉरंटी असलेल्या डिवाइसची संख्या जास्त आहे.
एक युजरनं Samsung Community फोरमवर माहिती दिली आहे की, जेव्हा यावर उपाय शोधण्यासाठी ते Samsung सर्विस सेंटरवर गेले. तेव्हा डिस्प्ले बदलण्यासाठी 15,515 रुपये मागण्यात आले. Android Police च्या रिपोर्टनुसार अशी समस्या गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये देखील समोर आली होती.