हॅथवेवरून मिळणार नेटफ्लिक्सची सुविधा
By शेखर पाटील | Published: September 5, 2018 09:41 AM2018-09-05T09:41:55+5:302018-09-05T09:42:02+5:30
हॅथवे कंपनीच्या ब्रॉडबँडवरून आता नेटफ्लिक्स ही स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार असून यासाठी स्वतंत्र सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आला आहे.
हॅथवे कंपनीच्या ब्रॉडबँडवरून आता नेटफ्लिक्स ही स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार असून यासाठी स्वतंत्र सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच एयरटेल आणि नेटफ्लिक्समध्ये करार झाल्याची माहिती समोर आली होती. याच्या अंतर्गत एयरटेलच्या निवडक पोस्ट-पेड प्लॅन्सचे ग्राहक आणि या कंपनीच्या व्ही-फायबर ब्रॉडबँड सेवेच्या ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंत नेटफ्लिक्सची सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही सेवा कार्यान्वित होण्याआधीच हॅथवे या केबल व ब्रॉडबँड सेवेतील आघाडीचे नाव असणार्या कंपनीने यात आघाडी घेतली आहे. हॅथवे आता आपल्या ऑप्टीकल फायबर ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून ग्राहकाला नेटफ्लिक्सची सेवा प्रदान करणार आहे. कंपनीच्या अमर्याद डाटा प्लॅन असणार्या सर्व ग्राहकांना याचा वापर करता येणार आहे. यासाठी हॅथवेने स्वतंत्र सेट टॉप बॉक्सदेखील बाजारपेठेत सादर केला आहे. याचे मूल्य २,९९९ रूपये आहे. यासोबत एक रिमोट कंट्रोल देण्यात येणार आहे. यावर नेटफ्लिक्ससाठी स्वतंत्र बटन देण्यात आलेले आहे. यावर क्लिक केल्यावर युजर ही स्ट्रीमिंग सुविधा अगदी सुलभपणे वापरू शकतो. या सेवेसाठी हॅथवेसोबत बील भरण्याची सुविधा घेणार्या ग्राहकाला सेट टॉप बॉक्स मोफत देण्यात येणार आहे.
भारतात ऑन डिमांड या प्रकारातील व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा हळूहळू लोकप्रिय होत आहे. यावर ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा विपुल खजिना उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे बहुतांश सेवांवर आता भारतीय भाषांमधील कंटेंटदेखील उपलब्ध आहे. तर अलीकडेच काही वेब सेरीज या तुफान लोकप्रिय झाल्यामुळेही स्ट्रीमिंग सेवांची लोकप्रियता वाढीस लागली आहे. यातच फक्त स्मार्टफोन, लॅपटॉप वा डेस्कटॉपसोबत आता टिव्हीवरही याला पाहणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या अनुषंगाने हॅथवेने या दिशेने पाऊल टाकत टिव्हीवर हे कंटेंट पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची बाब विशेष मानली जात आहे.