WhatsApp Hack करण्याची नवीन पद्धत; एक चूक अन् स्कॅमर्सच्या हाती तुमचे अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:59 PM2023-07-25T17:59:42+5:302023-07-25T18:00:34+5:30
WhatsApp Hack: पूर्वी फेसबुकवरुन स्कॅम केले जायचे, पण आता व्हॉट्सअॅपवरुनही स्कॅम सुरू झाले आहेत.
WhatsApp Hack: स्कैमर्स, लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धती वापरतात. अशाच एका पद्धतीबाबत पोलीस लोकांना सावध करत आहेत. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये लोकांना whatsApp scam बद्दल सांगितले आहे. विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर हा इशारा देण्यात आला आहे.
मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने बनावट फेसबुक आयडी बनवून पैशांची मागणी केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकरण देखील तशाच स्वरुपाचे आहे. पण, यात फेसबुकऐवजी WhatsApp चा वापर केला आहे. याची सुरुवात जागतिक योग दिनापासून म्हणजेच 21 जून रोजी झाली.
अशी होते फसवणूक
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्कॅमर्स आधी युजरचे Facebook अकाउंट हॅक करतात आणि हॅक झालेल्या अकाउंटमधून त्याच्या फेसबुकवरील मित्रांना Yoga Classes जॉईन करण्यास सांगतात. यानंतर स्कॅमर एक लिंक पाठवतो आणि समोरच्या व्यक्तिला त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतो.
लिंकवर क्लिक केल्यानंतर स्कॅमर, युजरला 6 अंकाचा OTP मागतो. युजरने त्याला OTP सांगितल्यावर स्कॅमरला त्याच्या व्हट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळतो. युजरने जो OTP शेअर केला, तो एक WhatsApp व्हेरिफिकेशन कोड असतो.
WhatsApp Hack झाल्यानंतर काय होईल?
या कोडच्या मदतीने स्कॅमर्सला युजरचा व्हॉट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळतो. यानंतर युजरच्या अकाउंटवरुन अनेकांना पैशांची मागणी करणारे मेसेज जातात. समोरच्या व्यक्तीला वाटते, मेसेज करणारा ओळखीचा व्यक्ती आहे, पण असतो स्कॅमर. अशा पद्धतीने व्हॉट्सअॅपवर स्कॅम केले जात आहेत.