आयफोन ८ व ८ प्लसची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Published: May 3, 2018 02:09 PM2018-05-03T14:09:39+5:302018-05-03T14:09:39+5:30
अॅपलने आपल्या आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या मॉडेलची रेड एडिशन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
अॅपलने आपल्या आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या मॉडेलची रेड एडिशन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अॅपलने गत सप्टेबर महिन्यात आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स हे तीन उच्च श्रेणीतील मॉडेल्स लाँच केले होते. यापैकी आयफोन ८ आणि ८ प्लस या मॉडेल्सची रेड एडिशन एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. नावातच नमूद असल्यानुसार या दोन्ही मॉडेल्स लाल रंगाच्या आवरणाने युक्त आहेत. आता या दोन्ही स्मार्टफोन्सची ही विशेष आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. यातील आयफोन ८ रेड आवृत्तीच्या ६४ आणि १२८ जीबी रॅमयुक्त मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ६७,९४० आणि ८१,५०० रूपये आहे. तर आयफोन ८ प्लस रेड आवृत्तीच्या ६४ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ७७,५६० आणि ९१,११० रूपये असेल. ग्राहकांना फ्लिपकार्टसह देशभरातील शॉपीजमधून आयफोनच्या या नवीन आवृत्त्या खरेदी करता येणार आहेत.
आयफोन ८ मध्ये रेटीना डिस्प्लेयुक्त ४.७ इंच आकारमानाचा तर आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड ट्रु-टोन डिस्प्ले आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये सिक्स-कोअर ए११ बायोनिक हा प्रोसेसर देण्यात आला आहे. आयफोन ८ या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा आहे. तर आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात डीपर पिक्सलची सुविधा आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.८ अपार्चरयुक्त असेल. तर दुसरा टेलिफोटो लेन्सयुक्त कॅमेरा एफ/२.८ अपार्चरयुक्त असेल. यात फोर-के क्षमतेच्या व्हिडीओ चित्रीकरणाची सोय आहे. आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये ऑग्युमेंटेड रिअॅलिटीचा सपोर्ट आहे. अॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअॅलिटी अॅप्सचा यात वापर करता येईल.