सॅमसंग गॅलेक्सी एस ८ची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Published: April 10, 2018 08:09 PM2018-04-10T20:09:57+5:302018-04-10T20:09:57+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनची बुरगुंडी रेड या रंगाचे आवरण असणारी नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स भारतात सादर करण्यात आले होते. यातील सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हे मॉडेल मेपल गोल्ड, ऑर्कीड ग्रे आणि मिडनाईट ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन बुरगुंडी रेड या नवीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून याचे मूल्य ४९,९९० रूपये असेल.
सॅमसंग गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमततेचा डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन वॉटर आणि डस्टप्रुफ आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. तर वायरलेस चार्जींगची सुविधा असणारी यातील बॅटरी ही ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.