विवो व्ही ७ प्लसची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Published: November 9, 2017 11:22 PM2017-11-09T23:22:10+5:302017-11-09T23:25:03+5:30
विवो कंपनीने आपल्या विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनची ‘एनर्जेटिक ब्ल्यू’ या रंगातील नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
विवो कंपनीने आपल्या विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनची ‘एनर्जेटिक ब्ल्यू’ या रंगातील नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन ७ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत गोल्ड, रोझ गोल्ड आणि मॅट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. यात आता ‘एनर्जेटीक ब्ल्यू’ या रंगाची भर पडली आहे. याचे मूल्यदेखील मूळ व्हेरियंटप्रमाणेच अर्थात २१,९९० रूपये असून हा स्मार्टफोन ‘अमेझॉन इंडिया’वरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे.
विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असू यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० या प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. विवो व्ही ७ प्लस या मॉडेलमध्ये तब्बल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा कॅमेरा एफ/२.० अपार्चरयुक्त असून याला मूनलाईट ग्लो या प्रकारच्या सेल्फी फ्लॅशची सुविधा असेल. अर्थात याच्या मदतीने अतिशय उत्तम सेल्फी घेता येणार असल्याचा विवो कंपनीचा दावा आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे.
विवो व्ही ७ प्लस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित असलेल्या फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३२२५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.