Good Bye 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी गुगल सज्ज, खास डुडलने जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 09:38 AM2019-12-31T09:38:01+5:302019-12-31T09:41:22+5:30
गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.
नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळीही गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे.
जगभरात 2020 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गुगलने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केले आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबरची संध्याकाळ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लोकप्रिय सर्च इंजिन गुगलही New Year's Eve सेलिब्रेट करत आहे. या निमित्ताने गुगलने एक आकर्षक डुडल तयार केलं आहे.
गुगलच्या खास डुडलमध्ये Froggy (गुगलवर हवामानाची माहिती देणारा बेडूक) दाखवण्यात आला आहे. आकाशात सुंदर आतषबाजी देखील होत आहे. Froggy च्या शेजारी नववर्षाच्या स्वागतासाठी टोपी घालून बसलेली एक चिमणीही दिसत आहे. गुगलवर हवामानाची माहिती सर्च करणाऱ्या लोकांसाठी फ्रॉगी ओळखीचा आहे. 2020 हे वर्ष लीप इअर असणार आहे. आकाशात लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी या पाच रंगांची आतषबाजी होताना दिसत आहे. यावर्षीचं हे अखेरचं आणि विशेष गुगल डुडल लक्ष वेधून घेत आहे.
काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबर रोजी गुगलने नाताळच्या निमित्ताने आकर्षक डुडल तयार केलं होतं. गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी गुगलने आपल्या डुडलमध्ये फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट पाहणारी दोन अॅनिमेटेड हत्तीची पिल्लं दाखवली होती. तसेच एक घड्याळ देखील होते ज्यामध्ये 11:55 अशी वेळ दाखवण्यात आली होती. डुडलमध्ये दाखवण्यात आलेली निळ्या रंगाची छोटी पिल्लं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून फुग्यासोबत खेळताना तसेच आनंद लुटताना दिसत होती. 'थर्टी फर्स्ट' व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.