तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:09 AM2023-02-26T08:09:22+5:302023-02-26T08:11:41+5:30

मुद्द्याची गोष्ट : गुगलबाबा वाटतो तेवढा सज्जन नाही. तसा झुकरबर्ग अंकलही नाही. मेटा किंवा गुगलचा लोगो  बघा... सगळे गोल गोल दिसेल. तसेच तो तुम्हाला गोल गोल फिरवत असतो.

No matter how confused you are, we will decide! your data security in ai's hands | तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच!

तुमचं डोकं कितीही आपटा, निर्णय घेणार तर आम्हीच!

googlenewsNext

- पवन देशपांडे
सहायक संपादक

म्हाला खरंच असं वाटतं का की, आपले निर्णय पूर्णपणे आपणच घेतोय...? बरं घेतही असाल तर तुमचं त्यात असलेलं स्वतःचं असं डोकं किती म्हणावं?
जरा डोक्यावरून जाणारे अन् मनाला लागणारेही प्रश्न आहेत. पण, आहे हे असं आहे...

कारण एआय.
अर्थात, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स.
तुम्हाला आठवत असेल, अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा व्हावा म्हणून फेसबुकने बऱ्याच लोकांना त्यांचे मतपरिवर्तन होईल किंवा मत डळमळीत असेल तर पाहिजे त्या ठिकाणी झुकेल अशा पद्धतीने पोस्ट दाखविल्या होत्या. नंतर तो खटला चालला.. अन् बरे काही घडले. ट्विटरचेही असेच काही झाले होते. बोट्सचा वापर वाढला होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत दसपट पुढे असलेल्या अमेरिकेत हे होत असेल तर आपल्या देशात तर काय काय होत असेल, याचा विचार करा.
भारतात इंटरनेट सर्फिंगचं सर्वाधिक प्रमाण मोबाइलवर आहे आणि तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि तुमचं लोकेशनही अनेक कंपन्यांपर्यंत सहज पोहोचलेलं आहे. एवढंच काय, तुमच्या मोबाइलमधले नंबर्स, मेसेजेस, फोटोज आणि व्हिडीओही अनेक कंपन्यांना सहज पाहता येतात.
तशी परवानगीच आपण मोबाइलचे विविध ॲप्स वापरताना दिलेली नाही का? (आठवा, जर ॲप डाउनलोड केल्यानंतर वापरासाठी कोणकोणत्या परमिशन आपण देतो ते...)

एका टिचकीवर परमिशन देण्याची ही सवय आपल्याला आपल्या आयुष्यातील अनेक निर्णयांमध्ये त्यांना हवा तसा बदल करू देण्यापर्यंत गेली आहे. कारण, तुम्ही आता विचार जरी केला किंवा एखादी गोष्ट सहकाऱ्याशी डिस्कस जरी केली तरी त्यासंबंधीच्या अनेक जाहिराती तुमच्या ॲप्समध्ये, मोबाइलमध्ये आणि तुमच्या ई-मेलमध्ये यायला सुरुवात होतात. तुमच्या खरेदीच्या विविध निर्णयांमध्ये झालेला हा पहिला शिरकाव आहे. आधी ग्राहकाच्या मनात काय चाललंय याचा मागोवा घ्यायचा, तो काय सर्च करतोय, कुठे करतोय आणि केव्हा करतोय, याचा डेटा जमा करायचा. त्याच्यावर हवे ते संस्कार करायचे आणि त्यातून तुमच्या विचारांचा अंदाज घेऊन तुमच्या पुढ्यात तेच वाढून ठेवायचे जे त्यांना विकायचे आहे. विविध वस्तूंच्या जाहिरातींचा भडिमार तो असाच सुरू होतो.

तुम्ही कधी यू-ट्युब वापरले असेल तर तुम्हाला ते सहज कळेल. समजा तुम्ही ए. आर. रेहमानची गाणी सर्च केली. त्यातले एखादे गाणेही ऐकले की, पुढे जेव्हा केव्हा तुम्ही यू-ट्युबवर जाल, तेव्हा तुमच्या पुढ्यात ए. आर. रेहमानची इतर गाणी ठेवलेली असतील. कसं होत असेल बरं हे... साधंय... त्यांना तुमची टेस्ट कळली. अर्थात, एआयने तुमची आवड जाणून घेतली. अशा अनेक गोष्टी आपण सहज सांगून मोकळे होतो.  

आणखी एक उदाहरण बघू... आता प्रत्येकाच्या हाती स्मार्ट वॉच आहे, येतेय. स्टेटस सिम्बॉलसारखे आपण ती मिरवतो. बघा माझ्या वॉचमध्ये माझे हार्टबिट्स किती आहेत, माझा बीपी किती आहे, माझं शुगर किती आहे आणि मी किती चालायला हवे, किती पाणी प्यायला हवे हे सगळे दिसते... असे आपण फारच कौतुकाने सांगत असतो. पण, हा डेटा कुठे सेव्ह असेल, याचा विचार केलाय का? तुमचा बीपी सतत हाय किंवा लो होत असेल तर त्यासंदर्भातील जाहिराती तुम्हाला सुरू होतील, तुम्ही फॅटलॉसचा गोल ठेवून असाल तर तसे प्रोडक्ट्स तुमच्या पुढ्यात येतील.

हे कसे? उत्तर साधंय... एआय.
गुगलबाबा वाटतो तेवढा सज्जन नाही. तसा झुकरबर्क अंकलही नाही. मेटा किंवा गुगलचा लोगाे बघा... सगळे गोल गोल दिसेल. तसेच तो तुम्हाला गोल गोल फिरवत असतो. मोबाइलच्या ॲप्समध्ये तुमच्याच कामाच्या जाहिराती का येत असतील? त्याचं कारण म्हणजे, तुम्ही त्यांना पुरवलेला डेटा... उगाच नाही, तुमचा एक ई-मेल आयडी किंवा तुमचे लोकेशन अन् इतर डेटा हॅकर्स विकत... आणि विकत घेणारेही वेडे नाहीत. त्यांना मुळात तुमच्या डेटाचा फायदा होत असणार.. तो असा.
आता राहिला प्रश्न तुमच्या निर्णयांचा... काय केव्हा कधी खरेदी करायचे किंवा पाहायचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. पण, तुमच्यावर भडिमार करून सतत तुम्हाला उद्युक्त करणे तर एआयच्या हाती आहे. बरं त्यांना वाटतील ते पर्यात तुमच्यासमोर ठेवत राहणार.
मग सांगा निर्णय तुम्ही घेता की तो तुम्ही कसा घ्यावा, याचा पर्याय तुमच्या पुढ्यात ठेवला जातो?

तुमच्या विचारांचा अंदाज घेऊन तुमच्या पुढ्यात तेच वाढून ठेवले जाते जे त्यांना विकायचे असते.

Web Title: No matter how confused you are, we will decide! your data security in ai's hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.