20 वर्षानंतर नव्या ढंगात Nokia 6310 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 07:32 PM2021-07-27T19:32:55+5:302021-07-27T19:35:39+5:30
Nokia 6310 2021 launch: नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.
Nokia ने आज तीन फोन बाजारात सादर केले आहेत. यात एक रगेड फोन, एक लो बजेट स्मार्टफोन आणि एका फिचर फोनचा समावेश आहे. यातील फिचर फोन हा 20 वर्षांपूर्वी लाँच झालेल्या जुन्या नोकिया फिचर फोनचा नवा अवतार आहे. HMD Global ने नोकियाचा लोकप्रिय क्लासिक Nokia 6310 फोन नवीन फीचर्स आणि डिजाइनसह बाजारात आणला आहे. सध्या हा नवीन नोकिया 6310 युरोपियन मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केला गेला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.
Nokia 6310 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 6310 मध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन UNISOC 6531F प्रोसेसरवर चालतो. या फिचर फोनमध्ये 8MB रॅम आणि 16MB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच यात Series 30+ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी नोकिया 6310 मध्ये 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश देखील आहे. कनेक्टिव्हिसाठी हँडसेट मध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फायआणि एफएम रेडियो असे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमधील 1150mAh ची बॅटरी 7 तासांपेक्षा जास्त टॉकटाइम देते आणि अनेक आठवड्यांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Nokia 6310 ची किंमत
नवीन नोकिया 6310 सध्या युरोपमध्ये 59.90 युरो (अंदाजे 5,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. कंपनीने हा फोन तीन रंगात सादर केला आहे.