नोकिया ८ सिरोक्को : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: February 27, 2018 04:03 PM2018-02-27T16:03:41+5:302018-02-27T16:03:41+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ८ सिरोक्को हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ८ सिरोक्को हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल कंपनीने बार्सिलोना शहरात सुरू झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपल्या विविध मॉडेल्सचे अनावरण केले. यात नोकिया ७ प्लस, नोकिया १, नोकिया ६ (२०१८) आणि ८११० फोर-जी यांच्यासोबत नोकिया ८ सिरोक्कोचाही समावेश आहे. या सर्व स्मार्टफोन्समध्ये हेच मॉडेल सर्वात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज आहे. हा स्मार्टफोन आधीच उपलब्ध असणार्या नोकिया ८ या मॉडेलची पुढील आवृत्ती आहे. यातील बहुतांश फिचर्स हे अन्य फ्लॅगशीप मॉडेल्सप्रमाणेच आहेत. यात मेटलची बॉडी प्रदान करण्यात आली आहे. याच्या जोडीला हा स्मार्टफोन आयपी६७ मानकावर तयार करण्यात आला आहे. अर्थात हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून तो कोणत्याही प्रकारच्या विषम वातावरणात वापरणे शक्य आहे.
नोकिया ८ सिरोक्को या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा, पीओएलईडी या प्रकारचा आणि क्युएचडी म्हणजे २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ हा अत्यंत गतीमान असा प्रोसेसर यात असेल. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. तथापि, मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट नसल्यामुळे हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा यात दिलेली नाही. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ आणि १३ मेगापिक्सल्सच्या झेईस लेन्सयुक्त कॅमेर्यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याला ड्युअल टोन एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४ अंशाच्या विस्तृत व्ह्यू अँगलयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या मॉडेलमध्ये बोथी मोड देण्यात आला असून याच्या मदतीने फ्रँट व बॅक कॅमेर्यांचा एकचदा उपयोग करणे शक्य आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असेल.
नोकिया ८ सिरोक्को या स्मार्टफोनचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ७९९ युरो (सुमारे ५८ हजार रूपये) इतके आहे. एप्रिल महिन्यात हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात मिळेल. तर भारतात हे मॉडेल मे महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.