नोकियाच्या बनाना फोनवरही व्हॉटसअॅपची सुविधा
By शेखर पाटील | Published: July 9, 2018 10:39 AM2018-07-09T10:39:30+5:302018-07-09T10:41:47+5:30
नोकियाच्या बनाना फोन या नावाने ख्यात असणार्या नोकिया ८८१० या मॉडेलवरही लवकरच व्हॉटसअॅप वापरता येणार असून कंपनीने याची अधिकृत घोषणा केली आहे.
नोकियाच्या बनाना फोन या नावाने ख्यात असणार्या नोकिया ८८१० या मॉडेलवरही लवकरच व्हॉटसअॅप वापरता येणार असून कंपनीने याची अधिकृत घोषणा केली आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया या ब्रँडचे पुनरूज्जीवन करत अनेक मॉडेल्स बाजारपेठेत उतवरली आहेत. यात प्राथमिक ते उच्च श्रेणीतील विविध मॉडेल्सचा समावेश आहे. यात काही आयकॉनीक मॉडेल्सला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यामध्ये नोकिया ३३१०सह नोकिया ८८१० या विख्यात मॉडेलला नवीन युगाचा साज चढवत सादर केलेले आहे. यापैकी नोकिया ८८१० हे मॉडेल कधी काळी बनाना फोन म्हणून ख्यात होते. याला फोर-जी नेटवर्क सपोर्ट प्रदान करून काही अतिरिक्त फिचर्सचा समावेश करून रिलाँच करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन फिचरओएस या प्रणालीवर चालणारा आहे. विशेष बाब म्हणजे ही प्रणाली कायओएसपासून विकसित करण्यात आलेली आहे. तर कायओएसवर चालणार्या जिओफोनमध्ये व्हॉटसअॅप, फेसबुक आणि युट्युब वापरता येणार असल्याची घोषणा कालच मुकेश अंबानी यांनी केली. याच्या पाठोपाठ नोकिया ८८१० या मॉडेलमध्येही आता व्हॉटसअॅप वापरता येणार आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर जुहो सर्विकस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची अधिकृत घोषणा केली आहे.
आजवर बहुतांश फिचर्स फोन्समध्ये इंटरनेटच्या प्राथमिक वापरासह मोजक्या अॅपचा वापर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तथापि, यामध्ये व्हॉटसअॅपसारखे महत्वाचे मॅसेंजर अॅप नसल्यामुळे युजर्सची कुचंबणा होत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत, जिओफोनवर व्हॉटसअॅपसह अन्य अॅपच्या वापराची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर नोकियाच्या ८८१० या फिचरफोनमध्येही आता हीच सुविधा मिळणार आहे. यात २.४५ इंच आकारमानाचा आणि २४० बाय ३२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम ५१२ मेगाबाईट असून इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असला तरी पुढे मात्र कॅमेरा दिलेला नाही. तर यातील बॅटरी १,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.